You are currently viewing वेंगुर्ले-वायंगणी समुद्र किनारी डांबर सदृश्य चिकट पदार्थ; प्रदूषणाचा धोका वाढला

वेंगुर्ले-वायंगणी समुद्र किनारी डांबर सदृश्य चिकट पदार्थ; प्रदूषणाचा धोका वाढला

वेंगुर्ले वायंगणी समुद्र किनारपट्टी डांबरसदृश्य चिकट पदार्थाने झाली प्रदूषित

वेंगुर्ले
वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी समुद्र किनारपट्टीवर डांबर सदृश्य चिकट गोळे जमा झाल्याने किनारपट्टी काळीकुट्ट बनली आहे. दरवर्षी किनारपट्टीवर येणारे हे तवंग हा एक संशोधनाचा विषय बनत असून याची गांभीर्याने दखल घेणे गरजेचे आहे.
वेंगुर्लेतील बहुतांशी किनारपट्टीवर समुद्राच्या भरतीच्या पाण्याबरोबर तेल तवंगाचे लहान-मोठे गोळे सर्वत्र पडलेले आहेत. शिवाय हे गोळे चिकटमय असून ते मेणाप्रमाणे मऊ आहेत. तर कडाक्याच्या उन्हाने वितळून ते शुभ्र वाळूवर पडल्याने किनारपट्टी काळीकुट्ट बनत आहे.

किनारपट्टीवर चालताना तेलकट गोळे एकदा पायाला किंवा चपलाला चिकटले तर बऱ्याच प्रयत्नांनी ते निघता निघत नाही. तर येथील मच्छिमारांच्या जाळ्यांना हे तेलकट गोळे चिकटून नुकसान होत आहे. किनारपट्टीवर येणाऱ्या विदेशी पक्ष्यांच्या पायांना, पंखांना व चोचीला हे गोळे चिकटून त्यांना अपायकारक ठरत असल्याने किनारपट्टीवर येणाऱ्या विदेशी पक्ष्यांचे प्रमाणही दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे या तेल तवंगाचा फटका पर्यटनप्रेमींबरोबरच, स्थानिक मच्छिमार तसेच सागरी जैवविविधतेला बसत आहे. वेंगुर्ले तालुक्याचा विचार करता निसर्गाने मुक्त हस्ताने निसर्गरम्य अशा सागरी किनारपट्टीची उधळण केली आहे.मात्र दरवर्षी येणाऱ्या या तेल तवंगाने त्याला गालबोट लागत आहे.मात्र निसर्गाचा समतोल राखण्यासाठी या प्रदूषणाला वेळीच आळा घालणे आता गरजेचे बनले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा