समस्त महाराष्ट्रात ‘भारूडरत्न’ अशी ओळख असलेले प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचे काल (23 एप्रिल) रोजी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील चार दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. दरम्यान उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा सून नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
महाराष्ट्राला समृद्ध असा लोककलेचा वारसा लाभला आहे. हा वारसा पुढे घेऊण जाण्याचं काम मराठवाड्याचे अस्सल लोककलावंत निरंजन भाकरे यांनी केले. भारुड या लोककलेला त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते. एकनाथ महाराज यांची भारूडं आधुनिक काळात लोकांच्या ओठांवर आणणारे लोककलावंत म्हणून निरंजन भाकरे यांची ओळख आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत अनेक लोककलावंत होऊन गेले. मात्र, भाकरे यांचे लोककलेतील काम कायम अजरमार राहील असेच आहे. त्यांच्या ‘बये तुला बुरगुंडा होईल गं,’ हे भारुड अजूनही अनेकांचा तोंडावर आहे. त्यांच्या भारुड सादरीकरणामुळे त्यांना संपूर्ण मराष्ट्रात ओळख मिळाली होती. त्यांना लोककलेचा हा वारसा आपल्या परिवाराकडून मिळाला होता. हा वारसा नंतर त्यांनी संपूर्ण हयातभर जपला.