आंबोलीतील हल्ला करणारा तो प्राणी कोळसुंदा असल्याची माहिती

आंबोलीतील हल्ला करणारा तो प्राणी कोळसुंदा असल्याची माहिती

आंबोली

आंबोली जाधववाडीत शुक्रवारी सकाळी बाप लेकास सह एकूण पाच जणांवर हल्ला करणारा तो वन्यप्राणी कोळसुंदा अर्थात रानकुत्रा असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. तो पिसाळलेलाअसण्याची शक्यता असून त्याने अनेकांना जखमी केले असल्याने त्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिकांनी वनविभागाकडे केली आहे.
गुरुवारी रात्रीपासून या रानकुत्र्याने आंबोलीत सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास जाधववाडी येथे मांगरात दबा धरून बसलेल्या या रानकुत्र्याने स्थानिकांवर हल्ला केला. यात अशोक जाधव यांच्या हाताला, अक्षय जाधव यांच्या कानाला गंभीर दुखापत झाली. तर कृष्णा जाधव यांच्याही हाताला, यशवंत जाधव यांच्या छातीला या हल्ल्यान जखम झाली.

अन्यही काही लोकांवर त्याने हल्ला केला असून यात आंबोली गावठाणवाडी येथील राधाबाई धुरी, कामतवाडी येथील सतीश गावडे, सतीची वाडी येथे नंदू गावडे, चौकूळ मधील रामचंद्र गावडे, नांगरतास येथील आनंदी गावडे यांचा समावेश आहे.
या सर्व जखमींना आंबोली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले असून वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश जाधव तसेच आदिती पाटकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. तो हल्ला रानकुत्रा सदृश्य प्राण्याने केला आहे. प्रत्येकाला दात लागले आहेत. त्या प्राण्याला रेबीज असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या सर्व जखमींना रुग्णवाहकेतून सावंतवाडी येथे पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी डॉ. जाधव यांनी दिली.

दरम्यान, या प्रकारानंतर आंबोली सरपंच गजानन पालेकर,सदस्य काशिराम राऊत,शशिकांत गावडे,शंकर चव्हाण यांनीही अनेक आरोग्य केंद्रात येऊन जखमींची विचारपूस केली. तसेच वन क्षेत्रपाल दिगंबर जाधव, बाळा गावडे आणि वन कर्मचाऱ्यांसह प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले. त्यांनी जखमींची विचारपूस केली. यावेळी बोलताना त्यांनी त्या प्राण्याचा बंदोबस्त करण्यासाठी कर्मचारी लावले आहेत.मात्र तो सगळीकडे लोकवस्तीत जात आहे.बऱ्याच म्हैसी, गायी, कुत्रे यांनाही तो चावला आहे. त्यामुळे त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात येईल अशी ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा