सावंतवाडी
कोरोना बाधित रुग्णांना घरीच तपासणी करता यावी, यासाठी ऑक्सिमीटर आणि थर्मामीटरचे किट प्रत्येक बाधित कुटुंबाला देण्याबरोबर सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला या तीन तालुक्यासाठी शववाहीनी आणि रुग्णवाहिका देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज येथे झालेल्या आमदार दिपक केसरकर यांच्या बैठकीत घेण्यात आला. ही मागणी सावंतवाडी तालुका आरोग्य अधिकारी वर्षा शिरोडकर यांनी केली होती. त्यासाठी आवश्यक असलेले पैसे तात्काळ आमदार निधीतून उपलब्ध करून देवू, असे आश्वासन श्री.केसरकर यांनी दिली.
दरम्यान सावंतवाडी कुटीर रुग्णालयाचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी बाजूला असलेल्या पालिकेच्या विहिरीवरून तात्पुरती सोय केली जाईल. त्यासाठी साडेसहा लाख रुपये देण्याचे केसरकर यांनी मान्य केले. त्यानंतर परिसरात विहीर खोदण्यासाठी आपण लवकरच पैसे देऊ. या बाबतचा मुद्दा वैद्यकीय अधीक्षक उत्तम पाटील यांनी मांडला होता. तर वारंवार आवाहन करून सुद्धा सरकारी रुग्णालयात काम करण्यासाठी डॉक्टर पुढे येत नसल्यामुळे जे कोरोना काळात जे सेवा देतील त्यांना नोकरीत कायम करण्यासंदर्भात किंवा भरतीत प्राधान्य देण्यासंदर्भात आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो, असे सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे व प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांनी मांडले.
याबाबत आपण आरोग्य मंत्री व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेऊ, असे यावेळी श्री.केसरकर यांनी सांगितले