जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी,आ.वैभव नाईक,जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांची उपस्थिती
कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये आजपासून कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या उपस्थितीत कोविड केअर सेंटरचा शुभारंभ करण्यात आला.या रुग्णालयात ७० बेडची व्यवस्था करण्यात आली असून प्रथमतः ३० बेड कार्यान्वित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात कोरोना रुग्नांचे प्रमाण वाढत आहे.त्यामुळे अधिकाधिक बेडची आवश्यकता भासत आहे. त्यादृष्टीने कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाच्या इमारतीमध्ये कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे कुडाळ तालुक्याबरॊबरच जिल्ह्यातील कोविड रुग्नांना सोयीचे होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी रुग्णालयातील सोयी सुविधांची पाहणी केली. तसेच याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन दिवसांपूर्वी येथे भेट देऊन आवश्यक सोयी सुविधांचा आढावा घेतला होता.
यावेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक,पोलिस निरीक्षक शंकर कोरे, ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डाॅ. प्रमोद वालावलकर,डॉ. आकेरकर, डॉ. घुर्ये, डॉ. सौंदत्ती आदिंसह आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.