सालाबाद प्रमाणे यावर्षीच्या रमजान महिन्याला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभ झालेला आहे. या महिन्याची सर्व मुस्लीम बांधव आतुरतेने वाट पहात असतात.रमजान महिन्यासाठी सर्व भाविक मानसिक व शारीरिक दृष्ट्या तयार झाले आहेत. जगभरातील सर्व मुस्लिम बांधव रमजानचे पालन करण्यासाठी सिद्ध झाले असून दररोज सुमारे साडे चौदा ते पंधरा तासांचा उपवास, त्याचबरोबर पाच वेळा नमाज व रात्रीची विशेष तरावीहची नमाज आदा करण्यासाठी तयार झाले आहेत.दिवसभरात वेळ मिळेल तसा आपल्या दैनंदिन कामकाजातून वेळ काढून कुरआन पठण करून भक्तिभावाने या महिन्याचे पालन करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो.
रमजान महिना म्हणजे उम्मते मोहम्मदीला मिळालेली एक ईश्वरीय देणगी आहे.या महिन्याचे पालन करीत असताना आपल्यातील सर्व अवगुण दूर करून सद्गुणांचा स्वीकार करण्यासाठी या महिन्याचे पालन सर्वार्थाने केले जाते.पाच वेळा नमाज पठण, रात्री तराविहची नमाज, दिवसभराचा रोजा हे सर्व पालन करताना चुकीच्या गोष्टी करायला कोणाला वेळच मिळत नाही.म्हणूनच रमजान महिना इबादत अर्थात प्रार्थनेचा महिना म्हणून ओळखला जातो. याबाबत प्रेषित हजरत पैगंबरांनी म्हटले आहे कि – शाबान हा माझा महिना असून रमजान हा अल्लाहचा महिना आहे.या महिन्यातील सर्व पुण्य कार्याचे परिणाम अल्लाह देणार आहे. म्हणजेच आपण जे काही सत्कर्म करणार आहोत त्याचे पुण्य किती द्यायचे ते अल्लाहच्या मर्जीवर अवलंबून आहे.
रमजान महिन्यांमध्ये प्रत्येकाच्या दिनचर्येमध्ये आमूलाग्र बदल झालेला असतो.दररोज सकाळी कधीही वेळेवर न उठणारा माणूस या महिन्यात पहाटे काळजीपूर्वक जागा होतो.नमाज अदा करतो व आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तयार होतो.या महिन्यांमध्ये प्रत्येक पुण्य कार्याचे पुण्य सत्तरपट दिले जाते.दया,करुणा,भक्ती या सर्व गोष्टींचा महापूर या महिन्यांमध्ये आलेला दिसून येतो. जास्तीत जास्त सत्कर्म करून आपल्या खात्यामध्ये पुण्य जमा करण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करीत असतो .आपल्या वर्तनामध्ये अमुलाग्र बदल घडवीत असतो.परंतु हा बदल केवळ रमजान महिन्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण आयुष्यभर राहिला पाहिजे तरच रमजानचे सार्थक होईल.
(आय वाय शेख)
(वालावल)