प्राणवायूचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’

प्राणवायूचा तुटवडा भरून काढण्यासाठी ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’

राज्यातील वैद्यकीय वापरासाठीच्या प्राणवायूचा तुटवडा दूर करण्यासाठी रेल्वेमार्फत ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ चालवली जाणार आहे. यासाठी मध्य रेल्वे कळंबोली ते विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारो असा सुलभ मार्ग तयार करणार आहे. कळंबोली येथून रविवारी (१९ एप्रिल) विशाखापट्टणमच्या दिशेनं पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस धावणार आहे. ही एक्सप्रेस १० टँकरमधून प्राणवायू भरून घेऊन राज्यात परतणार आहे. प्राणवायूअभावी कोरोना  रुग्णांची स्थिती गंभीर झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सरकारनं द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू (लिक्विड मेडिकल ऑक्सिजन) रेल्वेनं नेता येऊ शकेल का याची विचारणा रेल्वेकडे केली होती.

रेल्वेने याची तांत्रिक व्यवहार्यता तपासून ऑक्सिजन एक्सप्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

या माध्यमातून द्रवरूप वैद्यकीय प्राणवायू आणि प्राणवायूच्या टाक्यांची (ऑक्सिजन सिलिंडर) वाहतूक होणार आहे. मुंबई आणि परिसरातील कळंबोली आणि बोईसर येथून ही ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टणम, जमशेदपूर, रुरकेला आणि बोकारो येथे पाठविली जाणार आहे. तेथून वैद्यकीय प्राणवायू भरून ही रेल्वे मुंबईत दाखल होईल. यासाठी मध्य रेल्वेने कळंबोली येथे डीबीकेएम वॅगन तयार ठेवल्या आहेत. रेल्वेला राज्य सरकारकडून १९ एप्रिलला टँकर पुरवठा केला जाणार आहे.

समतल वॅगनवर ठेवलेल्या रोड टँकरसह ‘रोल ऑन रोल ऑफ’ (रो रो) सेवेद्वारे द्रवरूप वैद्यकीय प्राणवायूची वाहतूक केली जाणार आहे. पुलांवरील रस्ते आणि ओव्हर हेड यंत्रणेमुळे रेल्वे वॅगनवर टँकर ठेवण्यावर मर्यादा होत्या. त्यामुळे विविध आकाराच्या रस्ते टँकरपैकी ३३२० एमएम उंची असलेले टी १६१८ मॉडेलचे टँकर १२९० मिमी उंची असलेल्या समतल वॅगनवर ठेवले जाणार आहेत. त्यांच्या चाचण्या आणि मोजमाप प्रक्रीया पुर्ण केली आहे.

हे टँकर कंळबोली येथील स्थानकात हलविले जाणार आहेत. तसेच रेल्वे वॅगनवर टँकर ठेवण्यासाठी आणि उतरविण्यासाठी विशाखापट्टणम. अंगुल आणि भिलाई येथे रॅम्प बांधण्याचे काम सुरू आहे. ऑक्सिजन एक्सप्रेस या ठिकाणी पोहचण्यापूर्वी हे कार्य पूर्ण केले जाणार आहे. तर कळंबोली येथील रॅम्प मजूबत केले जाणार आहेत.

ऑक्सिजन एक्स्प्रेसची वाहतूक जलद आणि विनाअडथळा होण्यासाठी रेल्वेकडून या मार्गावर ग्रीन कॉरिडोर तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तसेच या रेल्वेचे संचालन सुरळीत चालण्यासाठी उच्चस्तरावरून तिची पाहणी (मॉनिटरींग) केली जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा