You are currently viewing राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन

पुणे :

देवराई, दोघी, दहावी फ अशा अनेक चित्रपटांच्या माध्यमातून सिनेसृष्टीत आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सुप्रसिद्ध दिग्दर्शिका, निर्मात्या आणि पटकथालेखक सुमित्रा भावे यांचं आज पुण्यात निधन झालं. त्या ७७ वर्षांच्या होत्या. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत व्यक्त होत आहे.

दहावी फ, एक कप च्या, वास्तुपुरुष, संहिता असे अनेक मराठी चित्रपट व हिंदी लघुपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं होतं. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या कासव चित्रपटाला २०१६ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. सुमित्रा भावे यांनी सुमारे १४ चित्रपट, ५० हून अधिक लघुपट आणि चार दूरचित्रवाहिनी मालिकांसाठी लेखन केले होते. त्यांना अनेक आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाले. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजातून पदवी घेतल्यावर पुणे विद्यापीठातून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या दोन विषयात एम. ए. केले. शिवाय त्यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची ग्रामविकास विषयाची पदविका मिळविली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर भावे यांनी अनेक समाजसेवी संस्थांमध्ये विनामोबदला काम केले.

पुण्याच्या कर्वे विद्यापीठाच्या समाजसेवा संस्थेत दहा वर्षे प्राध्यापक आणि त्यानंतर सरकारप्रणीत कम्युनिटी अॅड अँड स्पॉन्सरशिपच्या त्या कार्यक्रम व्यवस्थापिका होत्या. त्यांच्या अनेक समाजकल्याणविषयक शोधपत्रिका प्रकाशित झाल्या होत्या. आकाशवाणीवर त्या वृत्तनिवेदिका होत्या. वयाच्या पंच्चाहत्तरीनंतरही त्या सिनेसृष्टीत जोमाने कार्यरत होत्या.

सुमित्रा भावे यांनी पहिला लघुपट 1984ला चित्रित केला. तेव्हापासून आतापर्यंत सलग 38 वर्षं त्या नियमितपणे चित्रपट बनवत राहिल्या.

दिठी, दहावी फ, अस्तु, एक कप च्या, कासव, घो मला असला हवा, जिंदगी जिंदाबाद (हिंदी), देवराई, दोघी, नितळ या काही निवडक चित्रपटांच त्यांनी दिग्दर्शन केलं.

त्यांना यासाठी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले.

तु्म्ही चित्रपट का बनवता, या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी म्हटलं होतं, “चित्रपट का बनवता?’ या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्या, अशी कुणी अट घातली तर मी म्हणेन, जीवन आणि समाज यांचा शोध घेण्यासाठीचं, एक सशक्त अवजार माझ्या हाती आल्यावर, तो घेण्याइतका आनंद चित्रपटाशिवाय दुसऱ्या कुठल्याच क्षेत्रात मिळाला नसता. म्हणून मी चित्रपट बनवत राहिले आणि बनवते. त्यातूनच उपयुक्ततावादाच्या पलीकडे जाऊन, आपण स्वत: जीवनाचा शोध घेण्यासाठी चित्रपट बनवावेत.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

three − 1 =