You are currently viewing कोनशी व असनिये येथे पुन्हा दोन माकडताप रुग्ण आढळले…

कोनशी व असनिये येथे पुन्हा दोन माकडताप रुग्ण आढळले…

उपचार करून घरी सोडले; खबरदारी घेण्याचे आरोग्य प्रशासनाचे आवाहन…

बांदा

कोनशी व असनिये येथे पुन्हा दोन माकडताप बाधित रुग्ण सापडले. दोन्ही रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसात कोनशीत २, डेगवे-मोयझरवाडी येथे १ व असनिये येथे १ असे एकूण ४ माकडताप बाधित रुग्ण सापडले आहेत.
गेल्या ८ दिवसात एकूण ४ रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. कोनशी येथील ४५ वर्षीय महिलेला ताप येत असल्याने तिच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू होते. तर असनिये येथील ६५ वर्षीय महिलेला देखील ताप, सर्दी असल्याने तिला बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. गेले आठ दिवस त्यांच्यावर याठिकाणी उपचार सुरू होते. उपचार घेतल्यानंतर दोन्ही रुग्णांना आज घरी सोडण्यात आले. दोन्ही रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे राष्ट्रीय विषाणू तपासणी संस्थेत (प्रयोगशाळेत) पाठविण्यात आले होते. एकूण १४ जणांच्या रक्ताचे नमुने पाठविण्यात आले होते. त्यातील दोघांचा आज पॉझिटिव्ह अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला.
कोनशी गावात यापूर्वी देखील माकडताप बाधित रुग्ण सापडला आहे. गावात हा दुसरा रुग्ण सापडल्याने आरोग्य विभागाने खबरदारीसाठी गावात सर्वेक्षण सुरू केले आहे. असनिये गावात यावर्षी पहिलाच माकडताप बाधित रुग्ण सापडला आहे. ऐन काजूच्या हंगामात माकडताप बाधित रुग्ण सापडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांनी काजू बागेत जाताना आरोग्य विभागाच्या वतीने पुरविण्यात आलेले डीएमपी ऑइल लावूनच जावे, तसेच घरी आल्यानंतर आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. ताप, सर्दी, खोकला ही लक्षणे आढळल्यास तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदीश पाटील यांनी केले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 3 =