ग्राहक राजासह ज्वेलरांचाही फायदा.
वैभववाडी
१ जून २०२१ पासून सोन्याचे दागिने व इतर वस्तूंसाठी हॉलमार्क बंधनकारक होणार असल्याचे सरकारच्यावतीने सांगण्यात आले आहे. हॉलमार्क सोन्याच्या शुद्धतेचे प्रमाणपत्र असून सध्या ते ऐच्छिक आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये केंद्र सरकारने एक घोषणा करुन १५ जानेवारी २०२१ पासून हॉलमार्क बंधनकारक करण्यात येईल असे म्हटले होते. हॉलमार्किंग व्यवस्थेत स्थलांतरित होण्यास तसेच भारतीय मानक ब्युरोकडे (बीआयएस) नोंदणी करण्यासाठी व्यवसायिकांना एक वर्षापेक्षाही जास्त मुदत देण्यात आली होती. कोव्हिड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर ही मुदत आणखी वाढवून देण्याची मागणी व्यवसायिकांनी केली होती. त्यानुसार सरकारने आणखी चार महिन्यांची मुदत देऊन हॉलमार्किंगच्या अंमलबजावणीसाठी १ जूनचा मुहूर्त ठरविला आहे
बीआयएसचे महासंचालक प्रमोदकुमार तिवारी यांनी सांगितले की, जूनपासून हॉलमार्किंगची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बीआयएसकडे आतापर्यंत चौतीस हजार पेक्षा जास्त ज्वेलरांनी नोंदणी केली आहे. आगामी दोन महिन्यात एक लाख ज्वेलरांची नोंदणी होण्याची अपेक्षा आहे. नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन व स्वयंचलित करण्यात आलेली आहे. १ जून पासून केवळ १४, १८ आणि २२ कॅरेटच्या सोन्याच्या विक्रीलाच परवानगी असणार आहे. ग्राहक व्यवहार सचिव लीना नंदन यांनी एका आभासी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, हॉलमार्कच्या अंमलबजावणीसाठी आणखी मुदतवाढ आता कोणीही मागितलेली नाही. बीआयएसकडे सध्या नोंदणीसाठी उत्साह दिसून येत आहे. ज्वेलरांना हॉलमार्किंगची परवानगी दिली जात आहे. त्यामुळे आता १ जून २०२१ पासून हॉलमार्कचे दागिने विकले जाणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. ग्राहकांने किती कॅरेटचे दागिने खरेदी केले व त्यांच्या दराची नोंद पावतीवर असणार आहे. जिल्ह्यातील सर्व ज्वेलरांनी हॉलमार्किंगची नोंदणी करून ग्राहकांना योग्य सेवा द्यावी असे आवाहन ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाध्यक्ष प्रा.श्री.एस.एन.पाटील, उपाध्यक्ष श्री.एकनाथ गावडे, संघटक श्री. सिताराम उर्फ दादा कुडतरकर व सचिव श्री.संदेश तुळसणकर यांनी केले आहे.