You are currently viewing कासार्डे तर्फेवाडीतील ‘त्या’ वृद्ध महिलेला सर्व स्तरातून मदतीचा ओघ

कासार्डे तर्फेवाडीतील ‘त्या’ वृद्ध महिलेला सर्व स्तरातून मदतीचा ओघ

तळेरे :

कणकवली तालुक्यातील कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी या वृध्द महिलेच्या घराच्या सद्यस्थितीबद्दल वृत्त प्रसिध्द होताच बुधवारी सकाळ पासून मदतीचा ओघ सुरु झाला. या वृत्ताची गंभीर दखल घेऊन कासार्डे गावातील ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रत्यक्ष घराच्या कामाला सुरुवात झाली. याबद्दल आजीने सर्वांचे आभार मानले आहेत.

कासार्डे तर्फेवाडी येथील वैजयंती मिराशी ही वृध्द महिला गेली 5 वर्षे अक्षरशः पडक्या घरात एकटीच राहत आहे. एवढे असुनही तिने आपल्याला घर बांधून मिळण्यासाठी अनेकदा सबंधीत यंत्रणेकडे मागणी केली. मात्र, शासकीय यंत्रनेच्या दिरंगाईमुळे ती अद्याप वंचितच राहिली. घरात अठराविश्व दारिद्र्य असुनही मिराशी आजी सर्व सण उत्साहात साजरी करत आहे. मात्र, येत्या पावसाळ्यात तिला राहण्यासाठी सुरक्षित निवारा नव्हता. ही बाब लक्षात घेऊन वृत्त प्रसिध्द झाले.

त्यानंतर कासार्डे ग्रामस्थ आणि कासार्डेतील विविध संघटना यांनी त्या आजीला मदत करायला तयार झाले. बुधवारी सकाळपासुन अनेकांनी घटनास्थळी भेट देऊन तिला आधार दिला. तसेच, तिला जीवनावश्यक वस्तू तांदूळ, बटाटे, डाळ असे महिनाभर पुरेल अशा वस्तू कासार्डे ग्रामविकास मंडळाच्यावतीने अध्यक्ष गुरु पाताडे, विजय पाताडे, गणेश पाताडे, अनंत नकाशे यांनी दिल्या.

तसेच, कासार्डे येथील साईबाबा स्पोर्ट्स क्लब यांच्यावतीने धान्य, कपडे, भांडी व रोख रक्कम अशी मदत करण्यात आली. त्यावेळी वैजयंती मिराशी यांनी सर्वांना आशीर्वाद दिले. यावेळी साईबाबा स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मिंगेल मन्तेरो, साईबाबा सोशल क्लबचे सल्लागार जयेश धुमाळे, नितीन लाड, प्रदीप नारकर तसेच कासार्डे गावचे सरपंच बाळासाहेब तानवडे, जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई, विद्याधर नकाशे, संजय नकाशे, गणेश पाताडे आदी मान्यवर उपस्थित होते.

तर विज वितरण कंपनीच्या तळेरे कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता मंदार काणकेकर यांनी घराला भेट देऊन विज मीटर जोडणी करुन वीजेची समस्या दूर केली.

सर्वप्रथम संजय देसाई यांची भेट (चौकट)
जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी या वृत्ताची दखल घेऊन बुधवारी सकाळी सर्वप्रथम भेट दिली. आणि मिराशी आजीला स्वतंत्र घर बांधून देण्याचा शब्द दिला. त्याचे काम शुक्रवारपासून सुरु होणार होते. तत्पूर्वी लोकसहभागातून घरकुलाचे स्वप्न पुर्ण होणार आहे.

कासार्डे येथील वैजयंती मिराशी आजीच्या घराच्या कामाचा शुभारंभ करताना सन्जय देसाई, सरपंच बाळाराम ताणवडे, विद्या नकाशे, गणेश पाताडे, संजय नकाशे, मंदार कानकेकर, वैजयंती मिराशी आदी उपस्थीत होते.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − 4 =