You are currently viewing राज्य सरकारच्या आदेशात गोंधळ; पुण्यात व्यापारी वर्ग कोर्टात जाण्याच्या विचारात

राज्य सरकारच्या आदेशात गोंधळ; पुण्यात व्यापारी वर्ग कोर्टात जाण्याच्या विचारात

पुणे

राज्य सरकारने संचारबंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे. या गोष्टीला व्यापारी वर्गाचा पूर्ण विरोध आहे. एकीकडे लोकांनी बाहेर येऊ नये म्हणतात तर दुसरीकडे रिक्षा, पेट्रोल पंप, शिवभोजन थाळी सुरू होणार असल्याचेही जाहीर करतात.

सगळं सुरू आहे मग आदेश कुठला आहे? आदेशच गोंधळाचा आहे, आम्ही कोर्टात जाण्याचा विचार करत आहोत या शब्दात पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी राज्य सरकारवरच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने जाहीर केलेल्या कडक निर्बंधांवरून व्यापारी वर्ग आक्रमक झाला आहे. आंदोलनातून हा विरोध नोंदवल्यानंतर प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत व्यापारी वर्गाने एक पाऊल मागे घेत दुकाने न उघडण्याचा निर्णय घेतला होता. याचवेळी राज्य सरकारच्या पूर्ण लॉकडाऊनला आमचा पाठिंबा असेल मात्र तो जाहीर केला नाहीतर तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ अशी भूमिका पुणे व्यापारी महासंघाच्या वतीने फत्तेचंद रांका यांनी घेतली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यात पूर्ण लॉकडाऊनची घोषणा केली नाही. याच निर्णयावरून व्यापारी वर्ग पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे.

याबाबत रांका म्हणाले, राज्य सरकार एकीकडे रस्त्यावरच्या स्टॉलला परवानगी देते आहे. शहर रिक्षा, खासगी वाहतुकीला परवानगी देत आहे. त्याद्वारे कोरोनाचे संक्रमण होत नाही का? संचार बंदीच्या नावाखाली अनेकांना परवानगी दिली आहे. याला आमचा पूर्ण विरोध आहे. सगळं सुरू आहे मग आदेश कुठला आहे? आदेशच गोंधळाचा आहे, आम्ही कोर्टात जाण्याचा विचार करत आहोत असेही रांका यांनी यावेळी सांगितले.

वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुण्यातील भीषण परिस्थिती अकडेवारीसह समजावून सांगितली. तसेच आगामी काळात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे दुकाने न उघडण्याची भूमिका व्यापारी वर्गाने घ्यावी अशी विनंती केली. त्याचा मान ठेवत पुणे व्यापारी महासंघाने प्रशासनासोबत झालेल्या बैठकीनंतर आपले आंदोलन स्थगित करत प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा