You are currently viewing विमा झाला मोठा..

विमा झाला मोठा..

इन्शुरन्स क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विमा एजंट कर्मचाऱ्यांच्या जीवनावर विचार करणारा एक लेख.

┈┅❀꧁विमा झाला मोठा….꧂❀┅┈

पप्पा आले…! पप्पा आले…! असं बोलून उड्या मारत मारत पाच वर्षांची मृण्मयी आपल्या वडिलांना मीठी मारणार, तेवढ्यात तिच्या आजीने जोरात धपाटा देऊन तिला लांब केले. “किती वेळा सांगितलं…? बापाने आंघोळ केल्याशिवाय त्याच्या जवळ जायचं नाही म्हणून”? आजीने ओरडत मृण्मयीला बेडरूम मध्ये नेले.
अगं पण आजी, माझे पप्पा तर मेडिक्लेम विकायला जातात. त्यांना कसा काय होईल कोरोना? मृण्मयी आजीला सांगत होती.
कसा होईल म्हणजे? कित्येक लोकं पैसे/ चेक, क्लेम पेपर्स तुझ्या बापाला देतात, विमा कंपनीच्या ऑफिस मध्ये ये-जा करत असतात, काय माहीत कोण, कुठून आलंय. नाक मुरडत आजी मृण्मयीला समजावत होती.

ही गोष्ट किती साधी आहे ना! पण दिवसभरातून आपल्या मुलीला कवेत घेण्यासाठी उत्सुक असलेल्या बाबाला झालेल्या दुःखावर कोणाचं लक्षच नव्हतं. त्याच्या मनाची झालेली घालमेल कोणाच्याच लक्षात आली नाही. असाही विमा एजंट आणि कर्मचारीवर्ग नेहमीच दुर्लक्षित राहिलाय. आज अत्यावश्यक सेवेत काम करणारे कर्मचारी म्हणजेच डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, पोलीस यंत्रणा आणि ईतर ह्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सगळे बोलताना दिसतात. त्यांची स्तुती झालीच पाहिजे, कारण तशी त्यांची मेहनतच आहे. आज प्रत्यक्ष त्यांचा संपर्क कोरोनाबाधित रुग्णांसोबत येतो. परंतु विमा क्षेत्रात काम करणारे कर्मचारी ह्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल काय? सध्याच्या दिवसात कश्या परिस्थितीतुन जातात हे विमा एजंट व कर्मचारी? कधी विचार केलाय का? आता तुम्हाला लगेच मनात येईल की, कमिशन/ पगार मिळतं ना.! मग केलं तर काय होतंय? बरोबर आहे आपला विचार…! म्हणूनच ह्या लेखाचं नाव मुद्दाम “विमा झाला मोठा” असं ठेवलंय.

कोरोना महामारीच्या काळात, सर्व विमा कंपन्यांना अत्यावश्यक सेवा म्हणून नियमितपणे चालू ठेवण्याचे आदेश शासनाने दिले. विमा कंपन्यांचे कामकाजाचे तास कमी करण्यात आले आहेत तरीही सर्व सेवा मात्र चालू आहेत. ह्यात सगळ्यात जास्त भीती आहे, ती म्हणजे विमा एजंट, कलेक्शन ऑफिसर आणि क्लेम ऑफिसरला. इन्शुरन्स कंपनीत व्यवहार करताना वापरात येणाऱ्या नोटा चेक तसेच क्लेम पेपर्स कोणाच्या संपर्कात आल्या असतील ह्याचा काहीच अंदाज लावू शकत नाही.

विमा हा सगळ्यांच्या आवडीचा विषय नाही आहे, परंतु ह्या काळात आता आवडीचा विषय झाला आहे काही विमा अभिकर्ते व अधिकाऱ्यांना हाच विमा विकणं जीवघेणा ठरतोय. वेगवेगळ्या विमा कंपन्या मध्ये अधिकारी विमा एजंट कोरोनाबाधित आहेत आणि बरेचअधिकारी आपला जीव गमावून बसले आहेत.

गेल्या आठवड्यात महिन्यात एका अवघ्या ३३ वर्षाच्या विमा एजंटचा बळी गेला. पत्नी आणि १५ महिन्याची मुलगी नशिबाला दोष देत आहेत. शासनाने विमा एजंट वगळता ईतर सेवेतील कर्मचाऱ्यांना ५० लाखाचे विमाकवच दिलेले आहे. मग ह्या सगळ्यात विमा एजंट कर्मचारी कर्मचारी शापित का?

खूप जणांना असा गैरसमज आहे की, सगळं बंद असताना कोण जातंय विमा कंपनीत? इन्शुरन्स मध्ये काम करणाऱ्या आम्हा सगळ्यांना सुद्धा असंच वाटत होतं. परंतु प्रत्यक्ष चित्र एकदम उलट आहे. बाहेर पडायला कारणं मिळत नाही म्हणून मेडिक्लेम च्या कारणाने कित्येकजण बाहेर पडतात विमा हप्ता वेळेवर भरण्यासाठी लोक सतर्क झाली आहेत यामुळे विमा कंपनीत गर्दी झालेली दिसते. नवीन मेडिक्लेम घेण्यासाठी एजंट ला बोलावणे येऊ लागलीत.

आज सुद्धा ह्या कठीण काळात विमा एजंट आणि कर्मचारी आपली ड्युटी एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पार पाडत आहे. देशाला सर्वाधिक GST मिळवून देणारे विमा क्षेत्र हे विमा एजंट व कर्मचारी नेहमीच आपले योगदान देत आले आहेत. ह्यामध्ये तरुण तसेच वयस्कर विमा एजंट आणि कर्मचारीच नव्हे तर, डायबेटीस, ब्लड प्रेशरचा त्रास असलेले, लहान मुलांना घरी सोडून माता, गरोदर स्त्रिया ह्या अविरत विमा सेवा देत आहेत.

आज जी अवस्था डॉक्टर, नर्स, पोलीस ह्यांची आहे तशीच अवस्था विमा एजंट कर्मचाऱ्यांची सुद्धा आहे. मुलांना प्रेमाने जवळ घेता येत नाही. घरात राहून सुद्धा घरात वावरू शकत नाही. सतत एकचं विचार मनात असतो, आपल्यामुळे आपल्या घरात कोणाला कसलाही त्रास होऊ नये. माझा एक मित्र विमा एजंट आहे आणि आणि तिचे पत्नी एका सरकारी इस्पितळात हेड नर्स आहेत, अश्या परिस्थिती मध्ये काय अवस्था असेल दोघांचीही? दोघेही आपले कर्तव्य पार पाडून घरी जातात खरे, परंतु मुलांना प्रेमाने जवळ घेऊ शकत नाही. शेवटी विमा एजंट कर्मचारी सुद्धा माणूसच आहे आणि त्याला सुद्धा भावना आहेतच.

हा लेख शासनाकडून आम्हाला मदत मिळावी ह्या उद्देशाने लिहिलेला नाही तर, नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या विमा अभिकर्ते कर्मचाऱ्यांना एक कौतुकाची थाप मिळावी ह्यासाठीचा एक प्रयत्न आहे. शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून विमा कंपन्या चालू ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु मुंबईमध्ये ज्या रेल्वे चालू झाल्या आहेत त्यामध्ये मात्र विमा अभिकर्ते आणि कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही. असो, तरीही आम्ही आमचे कर्तव्य पार पाडून विमा विकण्याचे व क्लेम देण्याचे चालू ठेवणार आहोतच.

जर विमा कंपन्या बंद राहिल्या तर अर्थव्यवस्था कशी चालणार? मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण ही विविध विमा कंपन्या मार्फत होत असते. परंतु सध्या विमा कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात देवाण घेवाणीच्या ह्या व्यवहारात वापरल्या जाणाऱ्या चेक कॅश आणि क्लेम पेपर्स मुळे जीवाला धोका पोहोचत आहे. म्हणूनच ह्या काळात विमा कर्मचाऱ्यांसाठी हेच आरोग्य झालायं अनारोग्य

आम्हाला खूप काही अपेक्षा नाहीत, पण निदान पाठीवर हात ठेवून नुसतं लढ म्हणा..

सर्व विमा कंपन्यांतील धैर्याने जनसेवा करणाऱ्या विमा अभिकर्ते व कर्मचारी योध्यांना हा लेख समर्पित…...🌹🌹🌹

प्रतिक्रिया व्यक्त करा