अवकाळी सलगर परिसराला दणका!

अवकाळी सलगर परिसराला दणका!

आंबे भुईसपाट, डाळिंबाची कळी गळाली, बेदाणा निर्मिती वर परिणाम

सलगर बुद्रूक (सोलापूर) :

सलगर बुद्रूक व परिसरातील दहा ते बारा गावांमध्ये जोराचा वारा व विजांच्या कडकडाटात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. पोटनिवडणुकीच्या धामधुमीत गुंतलेल्या प्रशासनाला शेतकऱ्यांचे नुकसान पाहण्यासाठी वेळ मिळेल का, असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे.

सलगर बुद्रूक व परिसरातील आसबेवाडी, सलगर खुर्द, मारोळी, चिक्कलगी, जंगलगी, लवंगी, सलगर खुर्द, येळगी, शिवनगी, सोड्डी, बावची आदी गावांमध्ये रविवारी (ता. 11) सायंकाळी पाच ते रात्री नऊच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोराचा वारा व पाऊस सुरू झाला. यामुळे उन्हाळी बहार धरलेल्या डाळिंब बागांची फुले गळून गेली आहेत.

आंब्याची झाडे उन्मळून पडली आहेत तर आंबे भुईसपाटही झाले आहेत. शेवगा व इतर तरकारी पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

द्राक्षाच्या काढणीनंतर बेदाणा निर्मितीची प्रक्रिया जोरदार सुरू आहे. पण अशा वातावरणाचा परिणाम बेदाणा निर्मितीच्या प्रक्रियेवर होत आहे. सुमार दर्जाचा बेदाणा तयार होण्याची शक्‍यता जास्त असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत. कोरोना महामारीमुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांची अवस्था आणखीनच वाईट झाली आहे.

दरम्यान, प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करू लागले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा