मऊ मऊ अंग तुझे,
कापसासारखे मज वाटे.
लपून बसतो तू रानात,
झुडुपांची जिथे गर्दी दाटे.
आवाज जरा आला तरी,
पाय उंचावून राहतो.
भीती मनास वाटली की,
कान टवकारून पाहतो.
हिरवे गवत कोवळा पाला,
खाणं तुला आवडे फार.
नटखट तुझे नखरे पाहून,
चिडवते तुला छोटी खार.
घमेंड तुला चपळतेची,
कासवाशी पैज लाविली.
कासवाला हसता हसता,
त्याने तुलाच हार दाविली.
टून टून उड्या मारत,
जेव्हा, समोरून तू जातोस.
काय सांगू तुला मी,
किती किती छान तू दिसतोस.
(दिपी)✒️
दीपक पटेकर, सावंतवाडी.