You are currently viewing सफरचंदाची शेती आता उष्ण वातावरणातही…

सफरचंदाची शेती आता उष्ण वातावरणातही…

पाचोड

भौगोलिक व वातावरणाच्या रचनेनुसार पीकपद्धती ठरलेली असते. तरी आवडीनिवडी, उपलब्धता अन् मळलेली वाट सोडून शेतकरी आता नवनवीन प्रयोग आत्मसात करीत आहे. थंड प्रदेशात येणारे फळ म्हणून सफरचंदाकडे पाहिले जाते. सफरचंद म्हटले की, काश्मीरची प्रकर्षाने आठवण होते. मात्र आता सफरचंदाची शेती उष्ण वातावरणातही करता येऊ शकते, त्याचा प्रत्यय पैठण तालुक्यातील दादेगाव (हजारे)च्या शेतकऱ्याने दाखवून दिला.

 

हा सफरचंद लागवडीचा संत भूमीतील प्रवास सर्वासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. हिमाचल प्रदेश व काश्मीर सारख्या थंड हवामानात येणारे सफरचंद आता उष्ण हवामान असलेल्या दुष्काळी पैठण तालुक्यात बहरताना पाहवयास मिळत आहे. पैठण तालुका हा मोसंबीचा आगर म्हणून ओळखला जातो. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून कमालीचे पर्जन्यमान घटून तालुक्यातील बागायती क्षेत्र इतिहास जमा झाले. एका प्रकारे परिसराला वाळवंटाचे स्वरूपच आल्याचे चित्र दृष्टीस पडू लागले.

 

सफरचंदाच्या फळबागा केवळ हिमालयाच्या कुशीतच बहरतात ही मक्तेदारी मोडण्याचा निश्चय करत दादेगाव (ता. पैठण) येथील शेतकरी गोपाळ भानुदास कुलट यांनी चक्क सफरचंदाची बाग लावून ती फुलवून दाखवून दिले. सप्टेंबर २०१९ मध्ये हिमाचल प्रदेशाहून त्यांनी ऑनलाईन एका रोपवाटीकेतून हर्मन- ९९ जातीची २०० सफरचंदाची रोपे मागवून शेतात १० बाय १२ फुट अंतरावर त्या रोपांची लागवड केली. रोप लागवडीनंतर १४ महिन्यांत आठ ते दहा फूट उंच वाढलेल्या या झाडांना आता फळे लगडली असून सध्या प्रत्येकी झाडाला १५ ते २० फळे आहेत. फळांची संख्या कमी असून सफरचंदाचा आकार, चव व रंग हे हिमाचलप्रदेशाच्या सफरचंदासारखेच आहेत.

 

जानेवारीत झाडाला कळ्या लागून जूनमध्ये फळे तयार होतात. आपण डाळिंब आणि पेरूच्या बागांसाठी वापरल्या जाणाऱ्या खतांचाच सफरचंदांच्या झाडांसाठी वापर केला. पुढील वर्षी तज्ञ व मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन आपण भरघोस फळे काढू असा आशावाद गोपाळ कुलट यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले ,’सुरवातीला थंड हवामानात वाढणारे सफरचंदाची रोपे आपल्याकडे तग धरणार का याबाबत मनात शंका होती, मात्र उष्णतेतही रोपे केवळ जगलीच नाही तर, त्यास फळे देखील लगडली आहेत. यावरून मराठवाडयात सफरचंदाची शेती यशस्वी होऊ शकते हे स्पष्ट झाले. यापुढे रोपांची संख्या वाढविण्याचा आपला विचार आहे.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × three =