रोटरी क्लबच्या सौजन्याने ग्रामपंचायतचा उपक्रम
वाढत्या अपघातांना बसणार आळा
सावंतवाडी
सावंतवाडी शिरोडा मार्गावरील मळगांव येथील झाराप-पत्रादेवी बॉक्सेललगत वारंवार होणारे अपघात टाळण्यासाठी या ठिकाणी बहिर्वक्र आरसे बसविण्याची मागणी नेहमी केली जात होती. या पार्श्वभूमीवर मळगावचे नवनिर्वाचित उपसरपंच हनुमंत पेडणेकर यांनी यासाठी सावंतवाडी रोटरी क्लबला सहकार्यासाठी पत्र दिले होते. या पत्रातील मागणीनुसार रोटरी क्लबने हे आरसे पुरविले असून चार दिशांना ते बसविण्यात आले आहेत. या ठिकाणी वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर हे आरसे बसविल्यामुळे स्थानिकांमधून व वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
झाराप पत्रादेवी बायपासच्या मळगाव बॉक्सेलकडे होणारे अपघात व त्या अनुषंगाने होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी मळगाव ग्रामपंचायतने आग्रही भूमिका घेत या आरशांची मागणी रोटरी क्लबकडे केली होती. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आवश्यक असलेले चार बहिर्वक्र आरसे रोटरी तर्फे ग्रामपंचायला देण्यात आले, अशी माहिती रोटरी क्लबचे सचिव म्हापसेकर यांनी दिली. ग्रामपंचायत मळगावने हा चांगला उपक्रम राबविला असून यापुढेही त्यांनी असे लोकोपयोगी उपक्रम राबविल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.