सुडाचे राजकारण आणि जनतेचे मरण
बांदा – दोडामार्ग हा राज्य महामार्ग महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला असलेल्या दोन तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा एकमेव दुवा आहे. इतकेच नव्हे तर महाराष्ट्र व गोवा राज्यांना जोडणारा पुर्वीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. दोडामार्ग तालुका निर्मिती पूर्वी हा साठ सत्तर गावांना तालुक्याच्या मुख्यालयाला, सावंतवाडीला व जिल्हा मुख्यालय सिंधुदुर्ग नगरीला जोडणारा महत्त्वाचा वाहतूक रस्ता होय.
असे असतानाही गेल्या पावसाळ्यात या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेला दुसरा पावसाळा आला तरी अद्याप उपाय नाही. विषेशत: बांदा शासकीय विश्रामगृह ते पानव्हळ या अति घनदाट लोकवस्तीच्या भागातील फक्त एक किलो मीटर रस्त्याची परीस्थिती पाहीली तर या रस्त्याच्या कडेला दुतर्फा जीवंत मनुष्य वस्ती आहे यावर विश्वास बसत नाही. आजुबाजुला असलेली घरे, झाडे, गाड्या यांचा रंग समजणे कठीण. हा एक किलो मीटर रस्ता वाहन चालक कसा पार करतात ते सुद्धा पहाण्यासारखे आहे. रस्ता आहे की नदी आहे हेच समजत नाही. येथे रहाणारे नागरिक टीव्ही वरील स्वच्छ भारत अभियान पाहून नेत्यांना लाखोली वाहत असतील यात शंका नाही. त्याही पुढे याभागात भविष्यात दुर्दैवाने टीबी सारखी महामारी आली तर आश्चर्य नको. या रस्त्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ स्वेता कोरगावकर, सावंतवाडी पंचायत समिती उपसभापती श्री शितल राऊळ,बांदा गावचे प्रथम नागरिक व कर्तबगार सरपंच श्री अक्रम खान, मंदार कल्याणकर, बाळा आकेरकर इत्यादि माजी सरपंच, अनेक आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, प्रतिष्ठीत नागरिकांसमवेत स्वतः रस्त्यावर उतरून दोन वेळा आंदोलन करूनही दखल न घेणारे
लोक प्रतिनिधी सुडाचेच राजकारण करून एक वेगळा प्रघात घालत आहेत असे खेदाने म्हणावेसे वाटते.
या रस्त्यावरून लोक प्रतिनिधींनी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रवास केला नसेल असे वाटत नाही. मग यांना बांदा गावची ग्रामपंचायत गेली दोन दशके विरोधी पक्षाच्या ताब्यात आहे याचा सुड घ्यायचा आहे काय? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडणे सहाजिकच आहे. इतकेच नव्हे तर स्थानिक नागरिक संबंधित लोकप्रतिनिधी सुडाचे राजकारण करून जनतेला छळत आहेत असे उघड उघड बोलतात. नाही तर शेकडो कोटी निधी आणल्याच्या गप्पा मारणारे लोक प्रतिनिधी, नागरिकांचे हाल पाहून, कमीतकमी एक किलो मीटर रस्ता करू शकले नसते काय?
डी के सावंत