( नम्र सुचना….
मी व्यक्त होत आहे…याचा अर्थ असा मुळीच घेऊ नये की मी “लाभार्थी”आहे…मी मा.नारायण रांवाचा एका रुपयाचाही लाभार्थी नाही. त्यामुळे दादा झिंदाबाद अशी आरोळी ठोकून… आणि लाभ मिळायचा बंद झाला की…मुर्दाबाद…या पठडीतला तर नाहीच नाही.. तेव्हा जवळचा वा दुरचा चष्म्याचा नंबर असला तरी माझे ह्यदयापासूनचे शब्दाकंन तटस्थ चस्म्यातून वाचावे ही नम्र विनंती.)
कोकणचे सुपुत्र, हिंदुह्यदयसम्राट स्व.बाळासाहेबांचे लाडके आणि कडवट तत्कालीन शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते ते अनेक खात्यामध्ये काम केलेले आणि आता भाजपाचे विद्यमान राज्यसभेचे खासदार मा.दादा यांचा आज वाढदिवस.
परशुरामाच्या या भूमीत जन्मलेले ,अस्सल आमच्या मालवणी मुलखातले दादा…त्यांचा आतापर्यंतचा प्रवास हा थक्क करणारा तर आहेचं पण ठरवल तर मालवणी माणूस काय करू शकतो यांचा महाराष्ट्रातील तमाम राजकीय मंडळीला संदेश देणारा आहे.मी आज राजकीय चर्चा मुळीच करणार नाही… राजकीय निर्णयात दादा कुठे चुकले…दादानी असं केल असत तर…सेना सोडली नसती तर…वगैरे वगैरे…एक सिंधुदुर्गचा सजग नागरिक म्हणून माझ्या द्रष्टीने हे असले प्रश्न या घडीला गौण आहेत…कारण आपल्या कोकणात राजकारण… राजकीय द्वेष, श्रेयवाद या सगळ्या गोष्टींचा कधीच अंत होणार नाही. दादांच्या बाबतीत अनेक अफवा,चुकीच्या बातम्या ह्या जशा विरोधकांकडून पेरल्या गेल्या तशा त्या अनेकदा आप्तस्वकीयांकडूनही पेरल्या गेल्या. अर्थात दादाना याची पूर्ण कल्पना आहे.ही गोष्ट खरी आहे की आपल्या नेत्यामध्ये असलेले चांगले गुण,त्यांची नेतृत्वक्षमता आणि आपल्या कोकणातील जनतेपोटी असलेली तळमळ हे सारं जनतेसमोर मांडण्याचं खरं काम हे कार्यकर्त्यांचं असत.यातूनच त्या नेत्याची प्रतिमा तयार होते.फक्त क्षणिक लाभ मिळवण्यासाठी झिंदाबाद म्हणून घोषणा देण्याला काहीच अर्थ नसतो.दादांच्या बाबतीत हेच झालं…दादा राजकारणी असले तरी तेसुद्धा एक मानवी संवेदना असलेले माणूस प्रथम आहेत.
माणुसकीचा धर्म पाळणारा तो माणूस… मग या माणुसकीच्या नात्याने गेल्या सुमारे तीस वर्षात दादानी समाजातल्या अशा असंख्य घटकांना कोणतीही अपेक्षा न ठेवता केलेल्या मदतीची यादी काढली तर एक भलं मोठ पुस्तक छापाव लागेल.ही मदत करतात त्यांनी ना कधी धर्म पाहिला,ना जात ना पंथ ना पक्ष..म्हणूनच इतर पक्षातील अनेकजण आजही दबक्या आवाजात का असेना जाणीव म्हणून उल्लेख करतात.
मी दादांच्या संपर्कात पहिल्या मालवण विधानसभेच्या निवडणूकीत आलो.तेव्हा मी,श्रीधर काळे,सुहास गवाणकर, हरी चव्हाण ,श्री ठाकूर अशी मंडळी भारतीय मजदुर संघाचं काम करत होतो.तेव्हा मी भा.म.संघाचा सरचिटणीस होतो.युती असल्याने त्या काळात जो एनराँनचा विषय तापलेला होता त्या विरोधात चाललेल्या आंदोलनातही आम्ही सक्रीय होतो.मला आठवत तेव्हा दांदाच्या प्रचारासाठी सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मालवण येथे बैठक आयोजित केलेली होती.त्यात दादाही होते.बैठकीत ओळखपरेड झाली..आणि प्रचारात कोणते मुद्दे असावेत यावर चर्चा सुरु झाली.सेनेचा एक कार्यकर्ता एनराँन या विषयावर बोलणार तेव्हा दादानी आपल्या शैलीत त्याला तात्काळ थांबवल व म्हणाले,एनराँन हा विषय पार्सेकर मांडतील..मी अवाकच झालो..माझी तर पहिली भेट..मी दादाना यापूर्वी कधी बघितलं पण नाही..त्यामुळे मला थोड दडपण आलं…आणि मी तो विषय मांडला…ही माझी पहिली भेट…
मी जेव्हा भा.म.संघाचा अध्यक्ष होतो तेव्हा महाराष्ट्रात युतीची सत्ता होती..आणि मा दादा पहिल्या मंत्रिमंडळात दुग्धविकास मंत्री होते.तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाचे अध्यक्ष स्व.आदरणीय श्रीपादभाई काणेकर होते.मी अनेकदा त्यांच्याबरोबर फिरायचो.त्या काळातील संघपरिवाराच्या समन्वयाची चांगली अनुभूती मला आली.मला एकदा भाई म्हणाले,”नकुल,मुंबईला एका महत्त्वाच्या विषयासाठी मा.मुंडेसाहेबाना व दादाना भेटायला जायचं आहे.गाडी घेऊन जाऊया तू माझ्याबरोबर चलं.चार दिवसांत परत.भाईनी सांगाव आणि ते न ऐकाव..हा विषयचं नव्हता.मी तात्काळ होकार दिला आणि मुंबईला निघालो.. बांदा ते सावंतवाडी या प्रवासात भाई एकटेच गाडी चालवत होते.मला तेव्हा गाडी चालवता येत नव्हती.. फक्त गप्पा मारणे…
दादानी दिलेल्या वेळेनुसार आम्ही दादांकडे गेलो..दादानी हसून स्वागत केल.चहा मागवला.जिल्ह्यातील घडामोडींची चौकशी केली..आणि भाईना प्रश्न केला…बोला श्रीपादजी काय काम आहे..?
भाई म्हणाले”आमच्या जिल्ह्यात आमच्या कार्यकर्त्याना अशासकीय पद एकदोनच दिलीत निदान ते वाटप ४०/६० व्हावे…यावर दादा हसले. व म्हणाले,”श्रीपादजी,आपला प्रस्ताव योग्य आहे,भविष्यात विचार करु..पण हाच निकष जरा बीडमध्ये मा.मुंडेसाहेबाना व जळगावत मा.खडसेसाहेबाना लावायला सांगा…हे सगळ दादानी अगदी हसत सांगितल आणि आम्हाला निरूत्तर केल.
दादाना मी माझ्या वैयक्तिक कामासाठी कधीच भेटलो नाही. दादांचा जेव्हा बंगला जाळला होता.तेव्हा भाजपचा पदाधिकारी म्हणून मा.मुंडेसाहेबाबरोबर गेलो होतो.मा.माजी आमदार डॉ. अशोकराव मोडक यांच्याबरोबर गेलो होतो…असं अनेकदा प्रासंगिक वैयक्तिक भेटी झाल्या.
सहा वर्षांपूर्वी दादांच्या वाढदिवसा निमित्ताने ओरसला शरदभवनात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल होत.त्यामध्ये बोलणाऱ्या वक्त्यासाठी विषय ठेवला होता,”न समजलेले नारायण राणे” यावेळी राणेसाहेब धरुन फक्त आठ जणांनाच बोलायची संधी दिली होती.त्यात एक भाग्यवान मी होतो.इतरांमध्ये मा.हर्षवर्धन पाटील,मा.जयंत पाटील,निलेश राणे,डॉ. जयेंद्र परुळेकर, नितेश राणे आणि सहकार खात्यातील पुण्याचे एक रिटायर्ड अधिकारी होते.( नांव आठवत नाही) सुत्रसंचालन अर्थात डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी केल होत.माझं नावं पहिल्यांदाच घेतल…मला दादा बरोबरच्या भेटीत आलेले अनुभव सांगितले… पण एक अनुभव जेव्हा सांगितला..तेव्हा मी व्यासपीठावर दादांकडे कटाक्ष टाकला…तेव्हा दांदाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते..तो अनुभव असा होता..
कणकवलीमधे जो व्रध्दाश्रम आहे त्या ठिकाणी मी एकदा माझा वाढदिवस साजरा केला होता.त्या सगळ्याना त्यांच्या आवडीचं जेवण देवून मग त्यांच्याशी गप्पा माराव्यात म्हणून मी आणि माझ्याबरोबर शहीद मनीष कदम यांचे पिताश्री शशिकांत कदम व विरमाता स्व.सौ.शुभदा कदम होत्या. त्या आश्रमात एक ७० वर्षाचे रिटायर्ड आँफिसर होते.त्याच्यांशी गप्पा मारताना मी त्यांची इतर चौकशी केली..व सहज एक प्रश्न केला..”आपण देवाला मानता का? त्यावर त्यांनी मला तात्काळ उत्तर दिलं.ते खूपच भावूक झाले होते.ते त्याठिकाणी भितीवर जो दादांचा फोटो होता त्या फोटोकडे बोट दाखवून म्हणाले,”हे बघा,देव माणसात असतो त्याची प्रचिती मला इथ आल्यावर आली.नारायण राव राणे हे माझ्यासाठी देव आहेत.इथं आल्यापासून मला परक्या ठिकाणी आलो असं अजिबात वाटत नाही. आम्हाला काय हवं नको याची वेळोवेळी दादा आणि सौ.निलमवहीनी जातीने चौकशी करतात. नेहमी ताजं जेवण मिळाल पाहिजे. औषध आणि उपचार यात कुठही हयगय होता नये याची आमचे दादा काळजी घेतात.ते भरभरून दादाबद्दल बोलत होते…आमचे दादा…आमचे दादा ही भावना त्यांच्या मनात खोलवर रूजली होती.
मी एकदा कोकणकन्येनं मुबंईला प्रवास करत होतो.माझ्याच डब्यात एक कणकवलीचा साधारण तीशीतला युवकं होता.तो आणि मी सीएसटीला सकाळी उतरलो.नेमके टिसी आले.आम्हा दोघांनाही त्यांनी तिकीट चेकिंगसाठी थांबवल.तेव्हा आतासारखी मोबाईलवर तिकीट दाखवण्याची सोय नव्हती.मी माझं तिकीट दाखवल…पण त्या युवकांच तिकीट कुठतरी हरवल.गाडीत टिसी आला तेव्हा ते होत.त्याने मला खुण केली म्हणून मी ही तिथचं थांबलो..टीसी आणि त्या युवकांमधलं संभाषण ऐकण्यासारखं होत…टिसीने फैलावर घेतल.ते उत्तर प्रदेश किंवा बिहारचे असावेत अस प्रथमदर्शनी वाटत होत. मी मध्येच हस्तक्षेप करुन म्हणालो,” सरजी उनके पास टिकीट था।कहाँ गिर गया होगा।..पण भैय्या काही ऐकेना…तो युवक म्हणाला,मै.झुट नही बोलता।सच बता रहा हू। नही तो मुझे अभी हमारे दादाको बताना होगा।भैय्या म्हणाला,कौन दादा? तो उत्तरला …नारायणराव राणे.नाम सुना होगा।…हा हा वो मिनिस्टर… असं म्हणून त्या टिसिनी त्या युवकाला सोडल..ही घटना माझ्या सवयीप्रमाणे डायरीत नोंद करून ठेवली होती..फक्त त्या कणकवलीच्या युवकांच नावं लक्षात नाही.. या घटनेवरून हे सिध्द होत की राजकारणात प्रशाशनावर एक पकड असावी लागते.दबदबा असावा लागतो आणि तो बाजारात विकत मिळत नाही तो निर्माण करावा लागतो.दादांच शिक्षण जास्त नसतानाही त्याने प्रशासकीय ज्ञान आत्मसात केलं ज्याचा उपयोग अवघ्या महाराष्ट्राला झाला.
न समजलेले नारायण राणे शब्दबंद्ध करणे म्हणजे फार कठीण काम…मला अनेक अनुभव आले.दादा जेव्हा प्रथमच युतीच्या सरकारात मंत्री झाले तेव्हा सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या निवडणूका होत्या. तेव्हा दादांच वास्तव्य हे कुडाळच्या यशधरा हाँटेलमध्ये असायचं.त्या निवडणूका युतीत लढल्या गेल्याने भाजपाची जबाबदारी माजी आ. संदेश कोंडविलकर यांच्यावर होती आणि मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्याबरोबर होतो.आम्ही आठ दिवस यशधरात होतो.जेवण नाश्ता हे सगळ तिथचं.इतरही कार्यकर्ते होते…आणि अधूनमधून दादा असायचे.प्रचार संपला तेव्हा मी तिथले मँनेजर बाईत यांना विचारल़ की..आमचं बिल किती झाल? बाईत म्हणाले…,”कसल बिल? दादानी सगळ्याचं बिल कालच पेड केलय..अर्थात हा अनुभव माझा एकट्याचा नाही… बंदोबस्तात असलेले पोलीस असोत,शासकीय अधिकारी असोत,कर्मचारी असोत किंवा कार्यकर्ते त्यांच्या जेवणाची,नाश्त्याची व्यवस्था केल्याशिवाय दादा कधीच जेवत नाहीत…
नाण्याला दोन बाजू असतात…त्याची फक्त एकचं बाजू पहातो,ऐकतो तेव्हा त्याच बाजूच्या गोष्टी कळतात…पण एखाद्याबद्द्ल आपलं मतं ठरवताना नाण्याची दुसरी बाजू पण पारखली पाहिजे… माझ्या तिस वर्षाच्या काहीकाळ राजकीय व गेली पंधरा वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असताना जो काही क्षणांचा सहवास दादांचा मिळाला जो अनुभव आला तो अगदी तटस्थपणे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मांडला..कुणाला आवडेल…न आवडेल…पण माझ्या रोखठोक स्वभावानुसार तो मांडला….
..दादा ,या शब्दात काही उणीवा असतील त्या मोठ्या मनाने माफ करा..जे आपल्याप्रती असणाऱ्या आदरापोटी मांडलय त्याचा स्विकार करा..ही विनंती..
आपणास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा…
..आपला…
.. अँड.नकुल पार्सेकर…
सावंतवाडी..
