You are currently viewing कोरोना टेस्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाही

कोरोना टेस्टशिवाय जिल्ह्यात प्रवेश नाही

सिंधुदुर्गनगरी :

जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांनंतर बुधवारी पहिल्यांदाच शंभर पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व मृत्यूचा आकडा पाहता सर्वांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. राज्य शासनाने दिलेले निर्देश तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात यायचे झाल्यास आरटीपीसीआर टेस्ट करूनच जिल्ह्यात यावे, असे सांगतानाच गर्दीच्या ठिकाणी न जाता घरी राहूनच आगामी येणारे सण साजरे करा, असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत केले.

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

बाहेरून येणार्‍या नागरिकांना आरटीपीसीआर करणे आवश्यक आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात जाणार्‍यांना व परत सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍या नागरिकांनी कोरोना टेस्ट करणे आवश्यक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांमध्ये टेस्टिंगची सुविधा मोफत असणार आहे. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर सर्वांचे सहकार्य अपेक्षित राहणार असल्याचेही जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी सांगितले.या महिन्यात गुडीपाडवा, महावीर जयंती व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती हे सण येत आहेत. हे सण प्रत्येकाने घरीच राहून साजरे करावे. प्रत्येकानं मास्क लावून, सोशल डिस्टनसिंग ठेऊन नियम पाळा, असे आवाहन जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा