You are currently viewing कणकवलीतील महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून हप्ते वसुली – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

कणकवलीतील महसूल विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून हप्ते वसुली – युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक

कणकवली :

कणकवली तालुक्यातील एका महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून गुरुवारी २३ जानेवारी २०२५ रोजी कणकवली उपविभागातील मायनिंग व्यावसायिक तसेच जमिनींचे व्यवहार करणाऱ्या एजंट यांच्यासोबत त्यांच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत वीस, पंचवीस, तीस, पन्नास पासून एक लाखापर्यंत हप्ता वसुली करण्यात आली. असा गंभीर आरोप करत याबाबतची तक्रार युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, महसूल विभागाने कोणाच्या नावाखाली ही रक्कम गोळा केली. तसेच पालकमंत्र्यांच्या सूचना आहेत असे सुद्धा या व्यावसायिकांना सांगण्यात आले असा आरोप त्यांनी प्रसिद्ध दिलेल्या निवेदनात केला आहे. त्यामुळे ही रक्कम कोणाला देण्यात येणार आहे ? या अधिकाऱ्यांनी एकूण किती रक्कम वसुली केली ? या जमलेल्या रक्कमेतील कोणाची किती टक्केवारी आहे ? याची सखोल चौकशी करा. अशी मागणी सुशांत नाईक यांनी केली आहे. वरिष्ठ अधिकारी व मंत्र्यांच्या नावे जमा करण्यात आलेल्या या वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी व त्त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी युवासेना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने करण्यात आल्याचे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी युवासेना कणकवली तालुका समन्व्यक तेजस राणे, विभागप्रमुख किरण वर्दम, अजित काणेकर, मंगेश राणे, चेतन वालावलकर उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा