सावंतवाडी नगराध्यक्षांची ती स्टेटमेंट आठवडा बाजारातील लोकांना त्रासदायक…

सावंतवाडी नगराध्यक्षांची ती स्टेटमेंट आठवडा बाजारातील लोकांना त्रासदायक…

सावंतवाडी

सावंतवाडीत मंगळवारी भरणारा आठवडा बाजार जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या आदेशान्वये आज बंद ठेवण्यात आला. कोरोनाचा वाढता प्रसार पाहता राज्य सरकारने बरेच निर्बंध घातले आहेत. परिणामी अंशतः लॉकडाऊन, रात्री संचारबंदी, शुक्रवार ते सोमवार पहाटेपर्यंत आवश्यक आस्थापने वगळता लॉकडाऊन जाहीर केले आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी त्याची अंमलबजावणी करत गर्दी होणारा आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले.

गेले काही आठवडे सावंतवाडीतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्या सुरू असलेले विरोधासाठी विरोधाचे राजकारण आणि श्रेयवाद यातून काही झाले तरी आठवडा बाजार सुरू राहणार अशी भूमिका सावंतवाडी नगराध्यक्षांनी घेत कालच “सावंतवाडीचा आठवडा बाजार सुरू राहणार” अशी स्टेटमेंट दिली होती. मुळात राज्य सरकार आणि जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावर आपली स्टेटमेंट मागे घेतली नसल्याने इतर आठवडे सावंतवाडीत आठवडा बाजार सुरू राहीले तसेच आजही सुरू राहतील या आशेवर गडहिंग्लज, घटप्रभा इत्यादी भागातून आठवडा बाजारासाठी येणारे व्यापारी हजारो रुपयांचा भाजीपाला, कांदे बटाटे इत्यादी वस्तू विक्रीसाठी घेऊन पहाटेच सावंतवाडीत दाखल झाले.

सावंतवाडी नगरपालिकेने पहाटे ६.०० वाजल्यापासून सावंतवाडीत आठवडा बाजार होणार नाही असे ध्वनिप्रक्षेपकावर जाहीर आवाहन करण्यास सुरू केले. त्यामुळे आठवडा बाजारासाठी तलावाच्या काठावर हजारो रुपयांचा माल विक्रीसाठी लावून बसलेले, गाड्या भरून आलेले व्यापारी या नाशवंत मालाचे करायचे काय? या चिंतेत होते. नगराध्यक्षांनी सावंतवाडीत आठवडा बाजार होणार असे जाहीर केल्याने आल्याचे काही व्यापारी म्हणाले.

कणकवली येथे भाजपाचीच सत्ता असताना तेथील नगराध्यक्ष बाजार बंद म्हणून सांगतात तर सावंतवाडीत शिवसेना बाजाराला विरोध करते म्हणून सावंतवाडी नगराध्यक्ष बाजार होणार असे जाहीर करतात, म्हणजे विरोधासाठी विरोधाचे राजकारण केल्याने राजकारणापोटी कष्टकरी, शेतकरी, व्यापाऱ्यांना नाहक त्रास करावा लागला आहे. कित्येक नागरिक व्यापाऱ्यांची भाजी वगैरे पाहून “आता हे गरीब लोक काय करणार त्या भाजीपाल्याचे? असे प्रश्न उपस्थित करत होते. राजकीय मंडळींनी राजकारण जरूर करावे परंतु गोरगरिबांच्या पोटाशी खेळू नये अशी विधाने सावंतवाडीत सकाळी काही नागरिकांकडून ऐकण्यात येत होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा