You are currently viewing तहसिलदारांच्या आश्वासनानंतर रेवंडी वासियांचे खाडीतील आंदोलन स्थगित…

तहसिलदारांच्या आश्वासनानंतर रेवंडी वासियांचे खाडीतील आंदोलन स्थगित…

आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास पुन्हा उपोषण करण्याचा इशारा

मालवण

मालवण तालुक्यातील रेवंडी नदी खाडीपात्रातील कांदळवनाची तोड करून अनधिकृतरित्या उभारण्यात आलेल्या अतिक्रमणाविरोधात संतप्त झालेल्या रेवंडी येथील ग्रामस्थांनी चक्क खाडीपात्रात उतरून आंदोलन केले. ग्रामस्थ खाडीपात्रात उतरल्याने तहसीलदार, वनविभागाचे अधिकारी, पतन विभाग व पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. त्यांनी आंदोलन कर्त्यांची भेट घेत अनधिकृत उभारलेल्या अतिक्रमणाची पाहणी केली.

यावेळी सदरच्या अतिक्रमणावर महसूल प्रशासन वनविभाग व पतनविभाग यांच्या वतीने संयुक्तरित्या कारवाई करू असे आश्वासन तहसीलदार अजय पाटणे यांनी दिले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र आठ दिवसात कोणतीही कार्यवाही न झाल्यास तिन्ही कार्यालयाच्या समोर एकाच दिवशी उपोषण सुरू करू असा इशारा ग्रामस्थांनी दिला.

यावेळी तहसीलदार अजय पाटणे, वनक्षेत्रपाल अमृत शिंदे, वनपाल श्रीकृष्ण परीट, वनरक्षक सारीक फकीर, पोलीस निरीक्षक सोनू ओटवणेकर, सरपंच प्रिया कांबळी, माजी सरपंच युवराज कांबळी, विद्यमान सदस्य सोनाली कोदे, पोलीस पाटील मनोदया कांबळी, रेवंडी शाखाप्रमुख संजय कांबळी, मसुरा विभाग प्रमुख अमोल वस्त, विजय कांबळी, लक्ष्मण रेवंडकर, भावेश कांबळी, अजित कांबळी, नरेश करलकर, विकास चेंदवणकर, प्रमोद कांबळी, बाबू मुणगेकर, प्रणय तळाशिलकर, सचिन मोरवेकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

रेवंडी खाडीपात्रात जांभा दगड व माती टाकून मार्ग तयार केला जात आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह बदलून त्याचा फटका रेवंडी गावाला असण्याची भीती आहे. याबाबत ग्रामपंचायतीने विरोध दर्शविला, प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. शासकीय पंचनामे झाले. कांदळवन व बंधारा तोड झाल्याचे स्पष्टही झाले. मात्र अद्याप कारवाई का नाही? गुन्हे का दाखल झाले नाहीत? याबाबत आज ग्रामस्थांनी वनविभाग पतन विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले. कांदळवन तोड हा गंभीर गुन्हा असताना वनविभाग कारवाई का करत नाही? पतन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या बंधाऱ्याची तोड झाल्याचे पंचनाम्यात स्पष्ट होते याबाबत पतन विभाग गप्प का आहे असे अनेक सवाल उपस्थित करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी खाडीत असलेल्या अनधिकृत अतिक्रमणाबाबत पतन व वनविभाग तसेच तहसीलदार प्रशासन यांच्या संयुक्तवतीने कारवाई करण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार पाटणे यांनी दिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा