You are currently viewing कुडाळ हायस्कूलच्या त्या वसतिगृहामध्ये कोणतेही गैरप्रकार घडलेले नाहीत…

कुडाळ हायस्कूलच्या त्या वसतिगृहामध्ये कोणतेही गैरप्रकार घडलेले नाहीत…

कुडाळ :-

कुडाळ हायस्कूल परिसरात उभारण्यात आलेल्या वसतीगृहामध्ये कोणतेही गैरप्रकार घडलेले नसून निनावी पत्रातील तथाकथीत आरोप हे धादांत खोटे आहेत. तसेच याबाबत अद्यापर्यंत कोणतीही तक्रार संस्थेकडे आलेली नाही. याच वसतीगृहाच्या बांधकामासंदर्भात करण्यात आलेले आर्थिक भ्रष्टाचाराचे आरोप देखील मंडळाला मान्य नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मंजूर अनुदानाचा पुरेपुर विनियोग करण्यात आलेला आहे असे कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह अनंत वैद्य यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

या प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, नॅक समितीने संत राऊळ महाराज विद्यालयाला कोणताही दंड कधीच आकारलेला नसून उलटपक्षी यावर्षी नॅक मुल्यांकनात संत राऊळ महाराज महाविद्यालयाला दर्जोन्नती प्राप्त झालेली आहे. नॅकचे मुल्यांकन हे शैक्षणिक दर्जा, विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणाऱ्या भौतिक सुविधा व गुणवत्तेच्या आधारावर केले जाते. पत्रात उल्लेख केलेले श्री.केदार सामंत यांना देण्यात येणाऱ्या मानधनाचा आरोप देखील पूर्णपणे खोडसाळ आहे.

शतक महोत्सव निमित्ताने सुमारे 4 कोटी 60 लाख रु. गोळा करण्यात आले व त्यातली एकही रुपया हा शाळेसाठी खर्च करण्यात आला नाही. हा आरोप देखील धादांत खोटा व संस्थेची व विश्वस्तांची बदनामी करणारा आहे. वास्तविक पहाता शाळेच्या शतक महोत्सवानिमित्त स्वतंत्र शतक महोत्सव समिती स्थापन करण्यात आली होती. शाळेचे आजी माजी विद्यार्थी व दानशूर व्यक्तींकडून सुमारे 85 लाख 35 हजार 741 रुपयांची देणगी प्राप्त झाली. या शतकमहोत्सव वर्षात जमा झालेली देणगी व शतक महोत्सव समितीच्या सल्ल्यानुसार प्रत्यक्ष झालेल्या खर्चाचा अहवाल व हिशोब शतकमहोत्सवी समितीच्या सदस्यांच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे मंडळाचे दरवर्षीचे सर्व हिशोब हे सनदी लेखापालांकडून तपासून घेऊन माननीय धर्मादाय आयुक्त यांचेकडे विहीत मुदतीत सादर केले जातात, त्यामुळे मंडळाच्या कोणत्याही निधीत आर्थिक गैरव्यवहार वा भ्रष्टाचाराचा आरोप हा तथ्यहीन असून केवळ मंडळाला बदनाम करण्याकरिता जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे.

या निनावी पत्राबाबत पोलीस निरीक्षक कुडाळ व जिल्हा पोलीस अधिक्षक सिंधुदुर्ग यांचेकडे रितसर तक्रार दाखला करण्यात आली असून याबाबत तपासात सर्व बाबी उघड होतील. मात्र सोशल मिडीयाच्या माध्यमातून या पत्राचा आधार घेऊन लोकांमध्ये संस्थेबाबत गैरसमज पसरविले जात असल्याने हा जाहिर खुलासा करणेत येत असल्याचे कराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळाचे सहकार्यवाह अनंत वैद्य यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा