You are currently viewing पांढरपेशी लोकांकडून गैरकृत्य होत असेल तर चिंतेचा विषय…

पांढरपेशी लोकांकडून गैरकृत्य होत असेल तर चिंतेचा विषय…

सोशल मीडियावरील निनावी पत्र…कुडाळमध्ये उद्रेक.

विशेष संपादकीय…

सोशल मीडियाचा वापर हा जसा करावा तसा होतो. एखाद्याची बदनामी असो वा प्रशंसा केवळ एका ओळीच्या लेखनाने सुद्धा सर्वत्र चर्चेचा विषय होतो. प्रिंट मीडियाच्या कितीतरी पट वेगाने बातम्या घरोघरी पोचतात. असाच प्रकार जिल्ह्यातील कुडाळ शहरात घडला. एका निनावी लिहिलेल्या पत्राने कुडाळ शहरात लोकांचा उद्रेक झाला आणि शहराची होणारी बदनामी थांबविण्यासाठी नागरिक एकजूट होत, निनावी पत्र लिहिणाऱ्या बरोबरच ज्या पांढरपेशी व्यक्ती विरोधात ते पत्र लिहिले गेले होते त्या व्यक्तीवरही कठोर कारवाई व्हावी यासाठी लोकांनी बैठक घेत पोलीस स्टेशन तसेच संस्थेच्या कार्यालयावर धडक मोर्चा नेला.
कुडाळ हायस्कुलच्या संस्थेवरील उपाध्यक्ष डॉ.अनिल नेरुरकर यांनी कुडाळ हायस्कुल च्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील एका विद्यार्थिनी तसेच महिलेशी गैरवर्तन केल्याचे “पिडीत विद्यार्थिनींचे पालक” या नावाने एक निनावी पत्र सोशल मीडियावरून पसरविण्यात आले तसेच कुडाळ शहरातील काही प्रतिष्ठित नागरिकांना पाठविण्यात आले. सदर पत्रामुळे कुडाळ शहरात संतापाची लाट पसरली. त्याच पत्रातून अन्य काही संचालकांवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले. त्यामुळे सोशल मीडियावर या पत्रामुळे होणारी शहराची बदनामी कुडाळ वासीयांच्या जिव्हारी लागली आणि तात्काळ शहरातील नागरिकांनी बैठक घेत संबंधित पत्र लिहिणाऱ्यावर तसेच ज्याच्या गैरकृत्याचा लेखाजोखा निनावी पत्रात मांडला आहे त्या संस्थेच्या उपाध्यक्षांवर देखील चौकशी होऊन कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस स्थानक तसेच संस्थेच्या कार्यालयावर धडक दिली.
कुडाळ शहरातील नावाजलेल्या हायस्कुल मध्ये घडलेला हा प्रकार लज्जास्पद असून त्यातील सत्यता बाहेर येणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी नागरिकांनी पोलीस स्टेशनवर धडक देत घडल्या प्रकारची चौकशी होऊन संबंधित निनावी पत्र लिहिणाऱ्याचा शोध घ्यावा व संस्थेच्या उपाध्यक्षांकडून कथित गैरवर्तन घडले असेल तर त्याची योग्य चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. नागरिकांनी यापुढे जात संस्थेच्या कार्यालयावर आपला मोर्चा वळवत, संबंधित संस्था उपाध्यक्षांच्या कृत्याची चौकशी करून त्यांना संस्थेतून काढून टाकण्यात यावे, तसेच संस्थेच्या इंग्रजी माध्यमाला दिलेले संबंधित व्यक्तीचे नाव तात्काळ काढून टाकून त्यांच्या ऐवजी दुसरे नाव देण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे यापूढे संबंधित गैरकृत्य करणारी व्यक्ती शाळेच्या, संस्थेच्या आवारात आढळून येतात नये व आढळून आल्यास अनुचित प्रकार घडला तर त्याला संस्था जबाबदार राहील असे बजावण्यात आले. संस्थेने संबंधित व्यक्तीचे बोर्डावरील नाव योग्य त्या नियमांना अनुसरून काढण्यात येईल, तोपर्यंत कपड्याने झाकून ठेवण्याचे मान्य केले.

संबंधित प्रकरणी आरोप असलेले डॉ.अनिल नेरुरकर यांनी भाई तळेकर यांच्या सोबत पोलीस स्थानकात जात सदरचे गैरवर्तनाचे आरोप फेटाळून लावत आपल्या बदनामीचे षडयंत्र असल्याचे सांगितले आहे. निनावी पत्राने सोशल मीडियावर केलेली बदनामी हा सायबर क्राईमचा प्रकार असून पोलीसांनी प्रामाणिकपणे तपास करून दोषींवर योग्य कारवाई करावी अशी मागणी केली आहे. आपण अनेक वर्षे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असून आजपर्यंत आपल्यावर गैरवर्तनाचे आरोप झालेले नव्हते, या आरोपांमुळे आपण व आपले कुटुंबीय कमालीचे व्यथित झाल्याचे डॉ.नेरुरकर यांनी सांगितले.
नावाजलेल्या संस्थेवर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा अध्यक्ष, उपाध्यक्ष तथा संचालक म्हणून समावेश केला जातो. परंतु समाजातील पांढरपेशा समजल्या जाणाऱ्या प्रतिष्ठित व्यक्तींकडून ज्यावेळी अशाप्रकारे गैरवर्तन होते तेव्हा समाजात त्या व्यक्तीच्या बदनामीपेक्षा नावाजलेल्या समाजात मानसन्मान असणाऱ्या संस्थेची सर्वात जास्त बदनामी होते. संस्थेच्या इतर लोकांवर, संस्थेवर समाज घटकांची बघण्याची दृष्टी बदलते. परिणामी ज्या शहरात ती संस्था कित्येकवर्षं आपले एक वेगळे अस्तित्व जतन करून वाटचाल करत असते त्या शहराची देखील बदनामी होते. कुडाळ हायस्कुल हे कुडाळ शहरातील मानबिंदू म्हणून नावारूपास आलेले आहे, त्यामुळे संस्थेची होत असलेली बदनामी शहरवासीयांचीच बदनामी असल्याची भावना प्रत्येक नागरिकांमध्ये उत्पन्न होत आहे. त्यामुळे कोणत्याही सार्वजनिक संस्था अथवा समाज घटकांशी निगडित आस्थापनांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या जबाबदारीचे भान ठेवले पाहिजे.
सदरच्या निनावी पत्रातून केलेले आरोप खूपच गंभीर आहेत. अत्यंत हीन दर्जाचे आरोप सदर पत्रातून झाल्याने कुडाळ सारख्या शहरात पांढरपेशे, बुद्धिजीवी म्हणून वावरणारे प्रतिष्ठित लोक एवढ्या खालच्या पातळीवर का उतरतात? असा प्रश्न उभा राहत आहे. अशा बुद्धिजीवी, पांढरपेशा लोकांकडून गैरवर्तन होत असेल तर ते गंभीर आहे. सरकारकडून आलेला पैसा स्वतःची तुंबडी भरण्यासाठी वापरून ज्या संस्थेच्या कल्याणाची जबाबदारी खांदावर घेतली त्या शिक्षणाच्या पंढरीचीच लूट केली तर देवी शारदा त्यांना शासन केल्याशिवाय राहणार नाही. परंतु कुडाळमध्ये कथित घडलेल्या या प्रकाराची पोलिसांकडून निःपक्षपाती चौकशी होऊन संबंधित निनावी पत्र पाठवून संस्थेतील गैरकृत्य, गैरकारभार करणाऱ्यांचा शोध घेऊन घटनेतील सत्यता पडताळावी आणि कथित गैरवर्तन केलेल्या व्यक्तीवर देखील चौकशी अंती कडक कारवाई करावी. या प्रकरणावर पडदा न टाकता पोलिसांनी प्रकरणाची सत्यता जनतेसमोर आणावी, आणि ही जबाबदारी सर्वस्वी पोलीस प्रशासनाची आहे. तरच समाजात पांढरपेशे म्हणून उजळ माथ्याने फिरणारे पडद्याआड राहून वासनेच्या आहारी जात गैरकृत्य करणाऱ्यांना वचक बसेल आणि अशा व्यक्ती समाजातील सार्वजनिक ठिकाणी भविष्यात ताठ मानेने उभे राहणार नाहीत. कुडाळ शहरवासीयांनी एकजूट होऊन शहराची आणि शहरातील नामांकित संस्थेची होणारी बदनामी थांबविण्यासाठी हरसंभव प्रयत्न करावेत आणि समाजाला लागलेली पांढरपेशी किड जिथल्या तिथे ठेचून काढावी.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × four =