कोकणातील रस्त्या संदर्भात चर्चा ; खासदार विनायक राऊत यांचीही उपस्थिती
रत्नागिरी
रत्नागिर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक महामार्गाबाबत महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. उदय सामंत व शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी गुरुवारी केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी तळेरे कोल्हापूर रस्त्यासाठी 167 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ना.गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता या रस्त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. हा प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी महत्वाचा ठरणार आहे.
सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा हा महत्वाचा मार्ग असून स्थानिक ग्रामस्थ व सिंधुदुर्गवासियांमधून या रस्त्याची मागणी होत होती. त्या अनुषंगाने ना.सामंत व खा.राऊत यांनी याबाबत सतत पाठपुरावा केला. आज दिल्ली येथे ना.गडकरी यांची भेट घेऊन या रस्त्याबाबत तसेच जिल्ह्यातील अन्य रस्ता प्रकल्पांबाबत चर्चा केली. यावेळी तरेळे ते कोल्हापूर या रस्त्यासाठी 167 कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याचे ना.गडकरी यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे या निधीच्या उपलब्धतेनुसार लवकरच या रस्त्याचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे. सिंधुदुर्गच्या विकासासाठी हा रस्ता प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे. या रस्त्यासाठी भरीव निधी मंजूर केल्याबद्दल सिंधुदुर्गवासियांच्या वतीने खा.राऊत व ना.सामंत यांनी ना.गडकरी यांचे आभार मानले.