“म्हातारी मेल्याचं दुःख नाही तर अशाने काळ सोकावेल” याची भीती – मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे.
कुडाळ/ पूनम राटुळ :-
मागील बुधवार दि. २ सप्टेंबर २०२० रोजी रात्रौ कुडाळ नेरूर येथे अवैधपणे वाळू वाहतूक करणारे ३ डंपर महसूल अधिकऱ्यांनी अडवले मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे सदरील डंपर कारवाईविना सोडावे लागल्याची घटना स्थानिक वृत्तपत्रातील बातम्याद्वारे प्रसिद्ध झाली होती.”ठाकरे” सरकार मधील एका मंत्र्याच्या भावाने फोन करून सत्तेची भीती दाखवून महसूल अधिकाऱ्यांना अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनावर कारवाई करण्यापासून रोखले अशी जोरदार चर्चा कुडाळमधील जनतेत आहे. झाल्या प्रकारामुळे लाखो रुपयांचा शासन महसुल बुडला तर गेलाच परंतु अनधिकृत व्यवसायांना राज्यकर्ते पाठीशी घालत असल्याचा संदेश देखील तळागाळापर्यंत पोहचला आहे. एका प्रामाणिक कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला सत्तेचा धाक दाखवून कर्तव्यापासून रोखणे म्हणजे त्यांचे मानसिक खच्चीकरण करणारेच आहे. अलीकडेच कणकवली येथे वाहतूक पोलिसाला अशाच प्रकारच्या परिस्थिती ला सामोरे जावे लागले होते.
मुळात प्रशासकीय फेऱ्यात रखडलेले वाळूच्या लिलावांची कार्यवाही करण्यास अपयशी ठरलेल्या सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी अशाप्रकारे बेकायदेशीर कृत्यांना पाठिशी घालणे म्हणजे स्वतःच्या नाकर्तेपणाची जणू प्राचितीच दिल्यासारखेच आहे.जिल्ह्यातील हे रखडलेले वाळू लिलाव वेळीच लागले असते तर जिल्हावासीयांना माफक व कमी दरात वाळू उपलब्ध होऊ शकली असती ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे होतंय काय तर पोटापाण्यासाठी धडपडणाऱ्या वाळू व्यावसायिकांकडून महसूलचे वाहन ‘सारथी’ साहेबांची भीती दाखवत जोरदार “माया” गोळा करत असल्याच्याही तक्रारी आहेत. त्यामुळे अवैध वाळू व्यवसायावर नियंत्रण आणू इच्छिणाऱ्या कुडाळ तहसीलदारांनी “याही” प्रकारांचा छडा लावून कोणत्याही दबावाला बळी पडता निर्धास्तपणे आपले कर्तव्य बजावावे मनसे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील प्रसंगीे या अतिरेकी प्रवृत्तींविरोधात रस्त्यावर उतरून मनसे प्रशासनास सर्वोत्तपरी सहकार्य करेल अशी ग्वाही मनसेच्या वतीने कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली.