You are currently viewing राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची राणे कुटुंबियाने घेतली रुग्णालयात भेट

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची राणे कुटुंबियाने घेतली रुग्णालयात भेट

मुंबई

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार  यांच्यावर नुकतीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे  यांनी पवारांची भेट घेतली. नारायण राणे हे पत्नी नीलम आणि पुत्र आमदार नितेश राणे यांच्यासह पवारांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आले होते.

पक्ष वेगवेगळे असले, वैचारिक भूमिका भिन्न असल्या, तरी एखाद्या राजकीय नेत्याच्या आजारपणात त्याच्या प्रकृतीची विचारपूस करण्याची संस्कृती महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच पाहायला मिळते.

कोणे एके काळी आघाडीमध्ये शरद पवारांसोबत राहिलेले नारायण राणे हीच संस्कृती जपताना दिसत आहेत. त्यामुळेच पवारांच्या शस्त्रक्रियेनंतर राणेंनी सहकुटुंब जाऊन त्यांची विचारपूस केली.

मोदी ते राज ठाकरे, पवारांना फोन
शरद पवार ही राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च नेते आहेत. पवारांना पित्ताशयाचा त्रास जाणवल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि बहुतांश बड्या राजकारण्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली होती.
एन्डोस्कोपीद्वारे शरद पवारांवर शस्त्रक्रिया
शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया पार पडली. एन्डोस्कोपीद्वारे शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरमधील मोठा स्टोन बाहेर काढण्यात आला. त्यामुळे आता शरद पवार यांना पोटदुखीचा त्रास होणार नाही. मात्र, शरद पवार यांच्या गॉल ब्लॅडरवरही आणखी एक शस्त्रक्रिया करण्याची गरज आहे. ही शस्त्रक्रिया नक्की कधी करायची, याचा निर्णय अद्याप डॉक्टरांनी घेतलेला नाही. मात्र, आता शरद पवार यांची प्रकृती पूर्णपणे स्थिर आणि चांगली आहे.
या शस्त्रक्रियेवेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे आणि रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात उपस्थित होते. शस्त्रक्रिया झाल्यानंतर रात्री उशीरा हे सर्वजण ब्रीच कँडीमधून घरी परतले. सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांना दोन ते तीन दिवसांत रुग्णालयातून घरी सोडण्यात येईल, असे सांगितले.
सुप्रिया सुळेंकडून फोटो शेअर
सुप्रिया सुळे यांनी सकाळी शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे. पवारांची सकाळ नेहमीप्रमाणे वर्तमानपत्रांचं वाचन करत झाली, असं सुळेंनी सांगितलं.

शरद पवार यांची शस्त्रक्रिया का केली?

शरद पवार यांच्या पित्तनलिकेत एक खडा अडकून बसला होता. हा खडा उघड्यावर राहून देणे योग्य नव्हते. त्यामुळे तातडीने त्यांची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. दुर्बिणीद्वारे पित्तनलिकेतील खडा काढण्यात आला. त्यामुळे शरद पवार यांच्या यकृतावरील दाब कमी होईल. शरद पवार यांनी थोडी कावीळही झाली होती. तीदेखील कमी होईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.
ही शस्त्रक्रिया जवळपास अर्धा तास सुरु होती. आता शरद पवार यांची प्रकृती कशाप्रकारे सुधारते, यावर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी द्यायचा हे ठरवले जाईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा