खारेपाटण :
सिंधुदुर्ग जिल्हा सीमा प्रवेशद्वार खारेपाटण चेकपोस्टवर कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची तपासणी शुक्रवार २६ मार्चपासून आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य पथक तैनात करून आरोग्य तपासणी सुरू करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसात खारेपाटण चेकपोस्टवर जवळपास १८२ लोकांची तपासणी करण्यात आल्याचे समजते. शिमगोत्सव, होळी सण आल्याने दरवर्षीप्रमाणे मुंबईकर चाकरमानी किंवा परजिल्ह्यातून लोक आपल्या गावी येत असतात. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने सिंधुदुर्ग जिल्हा सीमा प्रवेशद्वार खारेपाटण येथे नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान खारेपाटण चेकपोस्ट येथे दिनांक २६/०३/२०२१ पासुन ते दिनांक ३१/०३/२०२१ पर्यंत आरोग्य पथक सकाळी ८ ते २ व दु. २ ते रात्री ८ वाजेपर्यंत दोन सत्रात ठेवण्यात आले असून या आरोग्य पथकात CHO डॉ. प्रणव पाटील, डॉ. प्रशांत कानदे, CHOडॉ. धनश्री जाधव, CHO डॉ. तेजस्वी पारकर,आरोग्य सेवक सागर खोत, गणेश तेली हे अधिकारी व कर्मचारी काम करत असून पोलीस यंत्रणेकडून ही वाहनांची तपासणी होत आहे.
वाहनांची तपासणी करणे, कोणाला सर्दी, ताप, खोकला किंवा कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्या व्यक्तीला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करणे, सदर व्यक्ती कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट भागातून आली आहे का याची माहिती घेणे, ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करणे, थर्मल गन, प्लस ऑक्सिमिटरचा वापर करून प्रवाशांची तपासणी करण्याचे काम सध्या खारेपाटण चेकपोस्ट येथील आरोग्य पथकाकडून करण्यात येत आहे.