You are currently viewing जि.प अध्यक्षा संजना सावंतांची आचरा कोविड लसिकरण केंद्राला आकस्मिक भेट

जि.प अध्यक्षा संजना सावंतांची आचरा कोविड लसिकरण केंद्राला आकस्मिक भेट

सुविधा पाहुन व्यक्त केले समाधान; डॉ जाधव यानी वेधले प्रा आ केंद्राच्या समस्याकडे लक्ष

मालवण

नुतन जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी आचरा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सुरू असलेल्या कोविड लसिकरण कक्षास आकस्मिक भेट देऊन पाहणी केली. या वेळी येथे लसिकरणाबाबत केलेल्या व्यवस्थेची पाहणी करून समाधान व्यक्त केले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ जाधव यांनी आरोग्य केंद्राच्या समस्यांकडे अध्यक्षांचे लक्ष वेधले. सदर समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सावंत यांनी सांगितले.

प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे ८मार्च पासून कोव्हिड १९ विरोधात प्रतिकार शक्ती निर्माण करण्यासाठी लसिकरण केंद्र सुरू केले आहे. शुक्रवारी सकाळी साडे नऊ वाजता जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी या केंद्राला आकस्मिक भेट देऊन आढावा घेत लसिकरण मोहिमे बाबत आढावा घेतला. यात प्रतिक्षा केंद्र, नोंदणी केंद्र, नियंत्रण कक्षाची पहाणी केली. या आरोग्य केंद्रात सुरू करण्यात आलेल्या हिरकणी कक्षालाही भेट देऊन पाहणी केली.

यावेळी त्यांच्या सोबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुबेर मिठारी, आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ शामराव जाधव, आरोग्य सहाय्यक व्हि डी ठाकूर यांसह अन्य कर्मचारी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ जाधव यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेबाबतच्या अडचणी ,अपुरा कर्मचारी वर्ग याकडे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांचे लक्ष वेधले. या वेळी सदर समस्या निवारण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा