You are currently viewing पुणे – मालवण बसला धडक ; स्कुटरचालक गंभीर जखमी

पुणे – मालवण बसला धडक ; स्कुटरचालक गंभीर जखमी

रानबांबुळी नजीक दुर्घटना ; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

मालवण
समोरून चालणाऱ्या टिपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात समोरून येणाऱ्या पुणे – मालवण एसटी बसला धडकून ऍक्टिव्हा स्कुटरचालक गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कसाल – मालवण महामार्गावर रानबांबुळी नजीक अणावकरवाडी येथे घडली. जखमी स्कुटरचालकाला नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. मात्र त्याचे नाव उशिरापर्यंत समजू शकले नव्हते. ओरोस पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.

मालवण आगाराची पुणे – मालवण बस (क्र. एम. एच. २०- बीएल २९१७) घेऊन चालक ज्ञानेश्वर सर्जेराव कायंदे आणि वाहक एस. आर. मांजरेकर हे मालवणकडे येत होते. कसाल – मालवण महामार्गावर रानबांबुळी नजीक अणावकरवाडी येथे समोरून येणाऱ्या टिपरला ओव्हरटेक करण्याच्या नादात ऍक्टिव्हा (क्र. एम एच ०१ – डीएस ३८२६ ) ने एसटीला समोरून जोरदार धडक दिली. बसचालकाने गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन अपघात वाचवण्याचा प्रयत्न केला. या दुर्घटनेत स्कुटर चालकाला गंभीर दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिकांनी जखमी स्कुटर चालकाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. ओरोस पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. उशिरापर्यंत जखमी स्कुटरचालकाचे नाव समजू शकले नव्हते.

प्रतिक्रिया व्यक्त करा