मुंबई
मुंबईत तब्बल 1000 मेगावॅट अतिरिक्त वीज आणण्याचा मार्ग मोकळा झाल आहे. 12 ऑक्टोबर रोजी मुंबईचा वीजपुरवठा खंडित झाल्याच्या पार्श्वभूमीवर अदानी इलेक्ट्रिसिटीने राज्याच्या ग्रीडमधून मुंबईत अतिरिक्त वीज आणता यावी म्हणून पालघर जिल्ह्यातील पुडूस येथून आरे कॉलनीपर्यंत तब्बल 80 किलोमीटर लांबीची वीज वाहिनी टाकण्यासाठी पारेषण परवाना मिळवण्याकरिता वीज नियामक आयोगाकडे (एमईआरसी) याचिका दाखल केली होती. त्यानुसार आयोगाने अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई इन्फ्रा. लिमिटेड या पंपनीला आंतरराज्य पारेषण परवाना दिला आहे. जवळपास 7600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेला हा पारेषण प्रकल्प पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देशही दिले आहेत.
वीजवाहिनीच्या कामावर स्वतंत्र कमिटीचा वॉच
मुंबईची विजेची मागणी वर्षाला सुमारे दीडशे-दोनशे मेगावॅटने वाढत आहे. त्याची दखल घेत वीज आयोगाने सदर वीज वाहिनी उभारण्याचे काम पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वीज वाहिनीचे काम वेळेत पूर्ण व्हावे म्हणून त्यावर वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र कमिटी नेमली असून वीज आयोग त्याचा वेळोवेळी आढावा घेणार आहे.