You are currently viewing स्मृतिगंध सोहळ्यास उस्फूर्त प्रतिसाद

स्मृतिगंध सोहळ्यास उस्फूर्त प्रतिसाद

आजगाव

हिंदुस्थानी शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीताचा प्रचार  व प्रसार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातही व्हावा, या भागातील कलाकारांना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेमार्फत ‘सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संगीत शिक्षणाचे आद्य प्रवर्तक, संगीताचार्य कै. रघुनाथ ऊर्फ बाबी मेस्त्री’ यांच्या स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा, त्यांच्या कार्याची ओळख तरूण पिढीला व्हावी या उद्देशाने ”स्मृतिगंध सोहळा” संस्थेच्या आजगांव येथील संगीत विद्यालयात दि. २१मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत यशस्वीरित्या संपन्न झाला. यावेळी संगीताचार्य कै. बाबी मेस्त्री यांचे सुपुत्र, सुप्रसिद्ध हार्मोनिअम वादक आणि सद्गुरू संगीत विद्यालयाचे संचालक श्री निलेश मेस्त्री सर, कै. बाबी मेस्त्री यांचे जेष्ठ शिष्य, सद्गुरू संगीत विद्यालयाचे पहिले संगीत विशारद श्री सुनील पाडगावकर सर, सुप्रसिद्ध सुत्रसंचालक श्री संजय कात्रे, जेष्ठ नाट्य दिग्दर्शक श्री भाऊ साळगांवकर, प्रसिद्ध तबला वादक श्री किशोर सावंत, श्री प्रसाद मेस्त्री, प्रसिद्ध हार्मोनिअम वादक श्री अमीत मेस्त्री, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सौ. दर्शना बाबर-देसाई(उद्योग व व्यापार सेल) राष्ट्रवादी सावंतवाडी तालुकाध्यक्ष श्री पुंडलिक दळवी, सौ. पुजा दळवी, सौ. मेस्त्री मॅडम, सौ. पाडगावकर मॅडम, उद्योजक श्री अण्णा झांट्ये, श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग संस्थेच्या अध्यक्षा संगीत विशारद सौ. वीणा दळवी, संस्थेचे सर्व पदाधिकारी, आजगांव ग्रामस्थ, संगीत विद्यालयाचे विद्यार्थी, पालकवर्ग इ. बहुसंख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने व संगीताचार्य कै. बाबी मेस्त्री यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी श्री  सुनील पाडगावकर, श्री निलेश मेस्त्री, श्री भाऊ साळगांवकर यांनी कै. बाबी मेस्त्री यांच्या आठवणींना व त्यांच्या  कार्यास उजाळा दिला. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिले संगीत विद्यालय व गांधर्व महाविद्यालयाचे पहिले केंद्र त्यांनी स्थापन केलं. ते एक अप्रतिम हार्मोनिअम वादक व संगीत तज्ञ होते. त्या काळातील अनेक दिग्गज कलाकारांना त्यांनी हार्मोनिअम साथ केली. अनेक विद्यार्थी घडविले. सिंधुदुर्ग रत्नागिरी कोल्हापूर सहित गोवा राज्यामध्ये तसेच आकाशवाणी केंद्रावर ही त्यांनी अनेक कार्यक्रम केलेत.

यावेळी श्री पुंडलिक दळवी, सौ. दर्शना बाबर-देसाई मॅडम, श्री किशोर सावंत यांनीही मनोगत व्यक्त केलं. ‘श्री राधाकृष्ण संगीत साधना सिंधुदुर्ग’ या संस्थेमार्फत आयोजित केलेल्या या ”स्मृतीगंध सोहळ्या”चे उपस्थित सर्वच मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. यावेळी संस्थेच्या वतीने श्री निलेश मेस्त्री, श्री सुनील पाडगावकर, श्री संजय कात्रे यांचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

संस्थेमार्फत संचलित संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी यावेळी सुंदर अशी शास्त्रीय उपशास्त्रीय मैफिल सादर केली. यावेळी श्री सुनील पाडगावकर सरांनीही आपल्या सुंदर सादरीकरणांने कार्यक्रमास रंगत आणली. या कार्यक्रमास हार्मोनिअम साथ श्री अमीत मेस्त्री यांनी तर तबला साथ श्री प्रसाद मेस्त्री यांनी केली. मान्यवरांनी व उपस्थित संगीत प्रेमीनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचं कौतुक करुन भरभरून दाद दिली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री भाऊ साळगांवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे सर्व पदाधिकारी व श्री गजा पांढरे, श्री सुनील वाडकर व विद्यार्थी वर्गाने मेहनत घेतली.

प्रतिक्रिया व्यक्त करा