You are currently viewing भडगाव खुर्दच्या पाणीप्रश्नावर आमदार निलेश राणे यांचा पुढाकार; पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन!
Oplus_16908288

भडगाव खुर्दच्या पाणीप्रश्नावर आमदार निलेश राणे यांचा पुढाकार; पाणीप्रश्न सोडविण्याचे आश्वासन!

कळसूली-दिंडवणेवाडी प्रकल्पातील पाणी पाइपलाइनद्वारे गावात आणण्याची ग्रामस्थांची मागणी; संबंधित विभागाला तातडीने आदेश देणार

जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करून भडगाव खुर्द गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावणार – आमदार निलेश राणे यांची ग्वाही

कुडाळ / (प्रतिनिधी) : गावातील पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा आणि शेतीला पाण्याची उपलब्धता व्हावी, या मागणीसाठी भडगाव खुर्दच्या ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. कळसूली-दिंडवणेवाडी प्रकल्पातील पाणी पाइपलाइनद्वारे भडगाव खुर्द गावात आणून उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. या मागणीची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी संबंधित विभागाला आवश्यक आदेश देण्यासह स्वतः जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

कुडाळ तालुक्यातील पणदूर-घोटगे रस्ता डांबरीकरण कामाचा भूमिपूजन सोहळा आज कुपवडे येथे पार पडला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भडगाव गावचे माजी सरपंच विजय माळकर यांच्यासह भडगाव खुर्द येथील ग्रामस्थांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांनी गावातील पाणीटंचाईची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली.

भडगाव खुर्द तळेवाडीला लागूनच कळसूली-दिंडवणेवाडी धरण आहे. या धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध असला, तरी तळेवाडीसह भडगाव खुर्द गावामध्ये पाण्याचे मोठे दुर्भिक्ष जाणवत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून धरणातील पाणी पाइपलाइनद्वारे गावात आणून उपलब्ध करून दिल्यास भडगाव खुर्दमधील शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, अशी भूमिका ग्रामस्थांनी मांडली.

ग्रामस्थांच्या या मागणीची आमदार निलेश राणे यांनी सकारात्मक दखल घेतली. संबंधित विभागाला याबाबत तातडीने आदेश देण्यात येतील. तसेच आपण स्वतः जलसंपदामंत्र्यांशी चर्चा करून भडगाव खुर्द गावाचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिले.

आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या या सकारात्मक प्रतिसादामुळे भडगाव खुर्द गावातील पाणीप्रश्न सुटण्याच्या आशा ग्रामस्थांमध्ये निर्माण झाल्या आहेत. विशेषतः शेतीसाठी पाण्याची उपलब्धता झाल्यास गावातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा