You are currently viewing सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात; पर्यायी पाणीस्रोताचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

सिंधुदुर्गनगरीत दररोज अर्धा तास पाणीकपात; पर्यायी पाणीस्रोताचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

*सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरणाच्या बैठकीत जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून विकासकामांचा आढावा*

सिंधुदुर्ग  : सिंधुदुर्गनगरी परिसरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याच्या दृष्टीने दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रत्येकी अर्धा तास पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सिंधुदुर्गनगरीच्या पाणीपुरवठ्यासाठी पर्यायी पाणीस्रोत निश्चित करून त्याचा सविस्तर आराखडा आठ दिवसांत सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रशासनाला दिले.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधुदुर्गनगरी नवनगर विकास प्राधिकरण समितीची बैठक झाली. या बैठकीत पाणीटंचाईच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासह प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

सिंधुदुर्गनगरी परिसरात सध्या सकाळी आणि सायंकाळी अशा दोन वेळा पाणीपुरवठा केला जातो. पाण्याची उपलब्धता आणि सध्याची टंचाई लक्षात घेता या पाणीपुरवठ्याच्या वेळेत कपात करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार सकाळी ७ ते ९ या वेळेत होणारा पाणीपुरवठा आता सकाळी ७ ते ८.३० या वेळेत, तर सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत होणारा पाणीपुरवठा एक तासासाठी केला जाणार आहे. अशा प्रकारे सकाळी व सायंकाळी प्रत्येकी अर्धा तास पाणीकपात करण्यात येणार आहे.

भविष्यातील पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी पर्यायी पाणीस्रोतांचा शोध घेण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. यासाठी सिंधुदुर्गनगरीच्या जवळील धरणसाठ्याचा पर्यायी स्रोत म्हणून विचार करून त्याची उपलब्धता, पाणीपुरवठ्याची शक्यता आणि आवश्यक उपाययोजनांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात आले. पुढील आठ दिवसांनंतर होणाऱ्या बैठकीत हा आराखडा सादर करण्यात येणार आहे.

 

*विकासकामांना गती देण्यावर भर*

सिंधुदुर्गनगरीच्या नियोजित विकासाच्या दृष्टीने प्राधिकरणांतर्गत विविध कामांचा यावेळी आढावा घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक उभारणी, शहर सुशोभीकरणाचा आराखडा, मुख्य प्रवेशद्वारासाठी स्वागत कमान, तसेच व्यापारी संकुल उभारणी याबाबत चर्चा करण्यात आली. शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्युत व्यवस्था, सूचना फलक, गतिरोधक आणि दिशादर्शक फलक यांसारख्या मूलभूत सुविधांच्या नियोजनावरही भर देण्यात आला.

याशिवाय क्रीडा संकुल उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देऊन तेथे अपेक्षित सुविधा निर्माण करण्याची प्रक्रिया गतिमान करण्याबाबत चर्चा झाली. शहराच्या नियोजनबद्ध विकासासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्याचे नियोजन करण्यात आले.

*१ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क*

सिंधुदुर्गनगरीतील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी येत्या १ डिसेंबरपासून स्वच्छता शुल्क आकारण्यात येणार आहे. शहरातील कचरा संकलन व व्यवस्थापनाची यंत्रणा सुरळीत ठेवण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. घरोघरी जाऊन कचरा संकलित करण्यासाठी नुकतीच वाहने उपलब्ध करून देण्यात आली असून, या माध्यमातून कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये निवासी १०० रुपये तर वाणिज्य २०० रुपये प्रति महिना शुल्क आकारणी असणार आहे.

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, तहसीलदार चैताली पवार यांच्यासह समितीचे सदस्य, आरोग्य, पाणीपुरवठा, जलसंपदा, नगर प्रशासन विभागांचे अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा