*”बाटलीबंद उरलेलं पाणी माणसाने फेकून दिले पण.., माकडाने वाया न घालविले…”*
*सांगा, शहाणा कोण..?*
हवामानाच्या लहरीपणाचा फटका केवळ मानव जातीलाच बसतो असं नव्हे तर पशु पक्षांना देखील बदलत्या वातावरणात स्वतःला हवामानाशी जुळवून घेणं कठीण होऊ लागलं आहे. कोकण प्रदेश म्हणजे तब्बल चार पाच महिने कोसळणारा पाऊस असाच आजपर्यंतचा अनुभव होता परंतु…,
२०२६ हे वर्ष अत्यंत कमी पर्जन्यमानासाठी ओळखले जाईल हे मात्र नक्कीच..!
कोकणात जांभूळ वृक्षाखाली जांभळाचा पडलेला सडा पाहून जुनेजाणते लोक सांगायचे…
“यावर्षी दुष्काळ पडणार असं वाटतं…”
आणि खरंच…
पावसाचं घटलेलं प्रमाण आणि त्यामुळे भविष्यात पाण्यासाठी करावी लागणारी वणवण याची कल्पना मनुष्यापेक्षा प्राण्यांना लवकर आली याची प्रचिती प्लॅस्टिकच्या बाटलीतील उरलेलं पाणी बाटलीसहीत मनुष्याने फेकून दिल्यावर घराच्या गच्चीत बसलेलं माकड ते पाणी वाया जाऊ न देता बाटलीचे झाकण उघडून आपली तृष्णा भागवत असल्याचं दिसत आहे….
तसं पाहिलं तर पाहणाऱ्याला हसू येईल असा हा प्रसंग..! पण, माणसांपेक्षा पशूंना अक्कल म्हणा किंवा समज थोडीशी जास्तच असल्याचे माकडाच्या कृतीतून दिसत आहे. पाऊस संपताच सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने “पाणी अडवा, पाणी वाचवा”…. “पाण्याचा अपव्यय टाळा” असे सरकार सांगत असताना माणसे मात्र निर्धास्त आहेत पण प्राणी जागृत झाले की काय…? अशी शंका यावी असा हा प्रसंग वाटत आहे.
ऑक्टोबर महिना संपला आणि रात्रीच्यावेळी किंचितसा गारवा हवेत पसरू लागला परंतु…,
दिवसा अंग भाजून निघेल असं पडलेलं कडक ऊन.. नि त्या उन्हात अंगाची होणारी काहीली, घशाला पडणारी कोरड यामुळे क्षणाक्षणाला पाण्याचा घोट प्यावा असे वाटू लागते मग सुरू होतो पाणी शोधाचा प्रवास..!
कदाचित उन्हाच्या तिरपीने हवालदिल होऊन तहानलेला माकड पाण्याच्या शोधात बाल्कनीत आला असता, त्याला पाण्याने अर्धवट भरलेली बाटली नजरेस पडली. त्याने ती बाटली दोन्ही हातानी उचलून झाकण उघडले त्याक्षणी पाणी मिळाल्याचा विलक्षण आनंद त्याच्या निरागस चेहऱ्यावर दिसून आला. दोन्ही हातांनी उचलून त्याने बाटलीतील पाणी पिऊन आपली तृष्णा भागवली. आजुबाजूला कोण आहेत याची तमा न बाळगता एकही थेंब वाया न घालवता तो पाणी पिण्यात गुंग झाला होता…
क्षणभर तो कुतुहलाने पाहणाऱ्या मनुष्य प्राण्याला हसवून गेला आणि…,
कळत नकळत माणसालाही निसर्गाला जपा…, पाणी वाचवा…, पाण्याचा अपव्यय करू नका…अन्यथा येणारे दिवस असंच कुठेतरी साठलेलं, सांडलेलं पाणी पिऊन दिवस काढावे लागतील असा संदेश वजा इशारा देत होता…
