You are currently viewing पणतीचे मनोगत

पणतीचे मनोगत

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पणतीचे मनोगत*

 

माझेच मला कळत नाही,

कुणासाठी तेवते मी?

 

रोज”शेकड्यांनी”मारण्याचा यमाचा हट्ट,

दहा दिवस, मृत्यूची माझी मैत्री घट्ट!

 

जन्मापासून तेल वात माझे सोबती,

विटेची भक्कम तटबंदी सभोवती.

 

प्राणज्योत मालवणारी व्यक्ती नाही दिसत,

खरे,खोटे मृतात्म्याचे कौतुक बसते ऐकत.

 

जळत, जळत बोलते आत्म्या सोबत,

इवला जीव अखंड असतो प्रकाशत.

 

प्रतिक असून मांगल्याचे मनाची कोंडी,

टोपलीखाली रोज जळते एकलकोंडी.

 

दहा दिवसांनी नदीत होते विसर्जन,

तेंव्हा संपते मूक माझे रूदन.

 

अशा अनेक जणी होतो प्रवाहपतीत,

पण मिळत नाही एकमेकींची संगत.

 

एकजूट आहे तेल, वात, पणतीची,

अंधाराला भेदत लयलूट प्रकाशाची.

 

दिवाळीला आतुरता सख्यांच्या भेटीची,

घरोघरी पणत्या लावून शृंखला ज्योतीची.

 

आतषबाजी फटाके व आकाशदिव्यांची,

पण…

पणती शिवाय मजा नाही दिवाळीची.

 

दिवाळी म्हणजे रंग बेरंगी दिपोत्सव,

तोच आमचा गेटटुगेदरचा आनंदोत्सव.

 

काही सख्या उजळवती घरे,

काही पाहती सुतकी चेहरे.

 

आमचे योगदान वर्षानुवर्षे,

किती पिढ्या अन किती वर्षे?

 

खरोखरी ‘भगवतगीता’ आम्ही जगतो,

“कर्मण्येवाधिकारस्ते मा

फलेषु कदाचन”या ब्रीदाने कर्म करतो

 

*प्रतिभा फणसळकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा