*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे लिखित अप्रतिम लेख*
🪔 *दिन दिन दिवाळी* 🪔
*’ नरकचतुर्दशी ‘*
आज ‘ नरक चतुर्दशी ‘. आजची पहाट रांगोळ्यांनी सजलेली, दिव्यांनी उजळलेली मंगल-प्रसन्न पहाट असते. आज पहाटेचे अभंगस्नान, यमाचे तर्पण, नरकभय निवारणासाठी दिवा लावणे, देवदर्शन, फराळाचा आस्वाद, रात्री दिव्यांची आरास असा दिवसाचा दिनक्रम असतो.
स्वर्ग आणि नरक या संकल्पना बहुतेक सगळीकडेच रूढ आहेत. आयुष्यात चांगली कृत्ये केल्यास मृत्युनंतर स्वर्ग मिळतो आणि वाईट कृत्यांमुळे नरकात जावे लागते अशी समजूत आहे. या नरकाचे सर्वांनाच भय असते. तेव्हा या नरकभयापासून मुक्त होण्यासाठी आजच्या दिवशी एक दिवा लावावा आणि संध्याकाळी घर, मंदिर, मठ या ठिकाणी दिव्यांची आरास करावी असे सांगितले आहे.
आजच्या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला. नरकासुर प्रागज्योतिष्पूर नगरीचा राजा होता. आपल्या आसुरी शक्तीने तो देव आणि मानव सर्वांना त्रास देत असे. त्याने सोळासहस्र राजकन्यांना पळवून आणून आपल्या कैदेत ठेवले. त्यांच्या सुटकेसाठी भगवान श्रीकृष्णाने युद्ध करून त्याला ठार मारले. त्या आनंदाप्रीत्यर्थ लोकांनी उत्सव साजरा केला. दिवे लावून अंधाराला, संकटाला, भीतीला दूर पळवले.
मरताना नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला. आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. श्रीकृष्णाने तसा वर दिला. म्हणूनच आज पहाटेच्यावेळी अभ्यंगस्नान करतात. आसुरी शक्तींचा,आसुरी महत्त्वाकांक्षेचा शेवटी नाशच होतो असा संदेश ही कथा देते. म्हणून प्रत्येकाने या दिवशी चांगले वागणे, चांगल्याची साथ देणे असा संकल्प केला पाहिजे.
स्त्री उध्दाराच्या या कामासाठी सत्यभामेने पुढाकार घेतलेला होता. नरकासुराच्या बंदीवासात राहिल्याने या राजकन्यांना कलंकीत मानले जाऊ नये, त्यांचे सामाजिक स्थान हीन होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने त्या सर्व राजकन्यांशी विवाह केला अशीही कथा आहे.
स्त्रियांवरील अत्याचाराच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. त्यांना आळा कसा घालायचा हा खरा प्रश्न आहे. यासाठी कोणी श्रीकृष्ण धावून येईल असा चमत्कार होणार नाही. त्यासाठी सर्वांनीच आपल्या मनात श्रीकृष्णाचे विचार जागृत करून स्त्री शक्तीचे रक्षण केले पाहिजे. यामधे स्त्रियांनी सुद्धा सहभागी व्हायला हवे. आपले रक्षण आपणच करण्यासाठी आवश्यक गोष्टी लहानपणापासून शिकायला हव्यात. मन कणखर बनून अंगी धिटाई येईल. मुली स्वयंपूर्ण बनतील. त्याचबरोबर मुलांना लहानपणापासून स्त्रीचा आदर करायचा, स्त्री-पुरुष दोघेही समान आहेत, कोणत्याही प्रसंगात त्रास द्यायचा नाही असेच संस्कार द्यायला हवेत. त्यामुळे मुला-मुलींची मानसिकता विवेकी, सुदृढ व निकोप बनून ते मोठेपणी सुजाण, जबाबदार नागरिक बनतील.
प्रत्येकाने आपल्या मनातल्या परमेश्वराचे स्मरण ठेवले; तर हातून वाईट कृत्य घडणारच नाहीत. जीवनाला नरक बनवणाऱ्या अस्वच्छता, आळस, प्रमाद, वासनांधता, व्यसनाधीनता या गोष्टी नरकासुरच आहेत. त्यांना आज नष्ट करायचे. वाईटातून चांगल्याची, अंधारातून उजेडाची वाट धरायची. तेव्हा चांगल्याचे रक्षण व्हावे, नाती जास्त जवळ यावीत यासाठी एकत्रितपणे पण नियम पाळत, सामाजिक भान राखत श्रध्देने, आनंदाने हा सण साजरा करू या.
___**__****______**__
*’लक्ष्मीपूजन ‘*
*ॐ महालक्ष्मी च विद्महे*
*विष्णुपत्नीच धीमही*
*तन्नो लक्ष्मी: प्रचोदयात् ||*
आज दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचा दिवस. आज समृद्धीची, संपन्नतेची पूजा केली जाते. यावेळी निसर्ग सुद्धा सर्वांगाने बहरून आलेला असतो. पावसामुळे धरणी हिरवीगार आणि शरद ऋतूचे आल्हाददायक वातावरण असते. शेतामध्ये धनधान्याचा हंगाम असतो. त्यामुळे आनंदाचे, चैतन्याचे वातावरण असते आणि हाच आनंद दिवाळीत ओसंडून वाहत असतो.
दारापुढे सुंदर रांगोळ्या, दाराला पाना फुलांचे तोरण, दिव्यांच्या माळा, फुलांच्या माळा, तेवत्या पणत्या, प्रकाशमान आकाश कंदील अशा थाटामध्ये प्रत्येक घर उजळून निघालेले असते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी सज्ज झालेले असते. मोठ्या उत्साहामध्ये लक्ष्मीपूजन केले जाते. दारिद्र्याचा अंधार दूर सारून समृद्धीचा दीप चेतवावा हा संदेश यावेळी सर्वार्थानं प्रकट होतो.
घरामध्ये, व्यवसायात समृद्धी रहावी, दारिद्र्य दूर व्हावे यासाठी लक्ष्मीची पूजा करायची. त्याच बरोबरीने कुबेराची पूजा केली जाते. कुबेर हा देवांच्या संपत्तीचा राखणदार समजला जातो. तो संपत्ती संग्राहक, धनाधिपती, पैसा कसा राखावा हे शिकवणारा, स्वतःला संपत्तीचा मोह नसणारा, अतिशय निरोगी आहे असे त्याचे गुण सांगितलेले आहेत. तेव्हा धनधान्य प्राप्त झाल्यावर मनुष्याला अहंकाराची बाधा होऊ नये यासाठी कुबेराचे स्मरण करायचे.
‘लक्ष्मी’ला चंचल म्हणतात. पण लक्ष्मी चंचल नसते. लक्ष्मीवान माणसाची मनोवृत्ती चंचल असते. वित्त ही एक शक्ती आहे. त्यामुळे मानव देवही बनू शकतो आणि दानवही बनू शकतो. लक्ष्मीला भोग प्राप्तीचे साधन समजणाऱ्या माणसांचा ऱ्हास हा ठरलेलाच असतो. लक्ष्मीची पूजा करून तिचा योग्य सन्मान करणार्याची भरभराट तर होतेच, पण इतरांनाही तो सहाय्यभूत होतो. म्हणूनच दैन्य जाणवेल इतके कमी पण नको आणि बुद्धीचा तोल ढळेल इतके जास्त पण नको, इतकेच धन देवाने द्यावे अशी त्याची प्रार्थना करायला हवी.
लक्ष्मीचा वापर कोण, कशासाठी करतो यावर तिचे फळ अवलंबून असते. विपरीत मार्गाने वापरली जाते ती ‘अलक्ष्मी’, स्वार्थात वापरतात ते वित्त, दुसऱ्यासाठी वापरली जाते ती ‘लक्ष्मी ‘आणि देवकार्यासाठी वापरली जाते तिला ‘महालक्ष्मी ‘ म्हणतात. उदारहस्ते सांस्कृतिक कार्यात, सत्कार्यात लक्ष्मी खर्च करणाऱ्याच्या घरी ती पिढ्यानपिढ्या वास करते. म्हणूनच म्हणतात,’लक्ष्मी ही एक महान शक्ती असल्याने ती चांगल्या लोकांच्या हातातच राहिली पाहिजे, तरच तिचा सुयोग्य वापर होतो.
लक्ष्मी प्रमाणातच मिळाली पाहिजे. कारण लक्ष्मीच्या नाण्याला दोन बाजू असतात. तिचा वापर स्वार्थासाठी करायचा का परमार्थासाठी हे आपणच ठरवतो. तेव्हा या वित्ताला अनर्थ न मानता जीवन सार्थकी लावणारी शक्ती मानून तिचे पूजन करायचे. बुद्धीचा समतोल राहू दे अशी प्रार्थना करायची.
एक गोष्ट महत्त्वाची आहे गैर मार्गाने आलेली लक्ष्मी कधीही स्थिर राहत नसते. तिच्यापासून शाश्वत सुख मिळत नाही तर प्रामाणिकपणे मिळवलेली लक्ष्मी शाश्वत सुखासमाधानाने आपली झोळी भरते. म्हणूनच असे सांगितले जाते की, “जो दुसऱ्याचे ओरबाडून खातो त्याला विकृती म्हणतात, जो आपले स्वतःचे खातो त्याला प्रकृती म्हणतात आणि जो आपल्यातले इतरांना खाऊ घालतो त्याला संस्कृती म्हणतात”. हेच या लक्ष्मीपूजनाचे सार आहे. लक्ष्मीमातेने सर्वांवर भरभरून कृपा करावी अशी तिच्या चरणी प्रार्थना करूयात.
*शुभ दीपावली.*🙏
*ज्योत्स्ना तानवडे. पुणे*
