देशी गाय हे समृद्धीचे प्रतीक – महेश संसारे यांचे प्रतिपादन
वसुबारसनिमित्त विद्या मंदिर मांगवली नं. १ येथे विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन
मांगवली : वसुबारस या सणाचे औचित्य साधून विद्या मंदिर मांगवली नं. १ येथे देशी गायीचे धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक व पर्यावरणीय महत्त्व सांगणारा विशेष मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. मा. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार आयोजित या कार्यक्रमात मांगवली गावचे सुपुत्र श्री. महेश संसारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना महेश संसारे म्हणाले की, देशी गाय हे भारतीय संस्कृतीचे वैभव आणि समृद्धीचे प्रतीक आहे. देशी गायीपासून मिळणारे दूध, तूप, दही, ताक, लोणी यांसारखी दुग्धजन्य उत्पादने ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देतात. तसेच गायीचे शेण व गोमूत्र यांचा उपयोग नैसर्गिक शेतीमध्ये करून जीवामृत, घनजीवामृत आणि सेंद्रिय खतांची निर्मिती करता येते.
पंचगव्यापासून विविध उत्पादने तयार करून ग्रामीण भागात स्वयंरोजगार व लघुउद्योगाच्या संधी निर्माण करता येतात. देशी गाय नैसर्गिक शेती, पर्यावरण संवर्धन, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि भारतीय धार्मिक परंपरेचा महत्त्वपूर्ण भाग आहे. त्यामुळे गोमातेचे संगोपन व संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
भारतीय संस्कृतीमध्ये वसुबारस सणाला विशेष महत्त्व असून, गाय आणि वासराचे पूजन हे कृतज्ञता, निसर्गप्रेम आणि पशुप्रेमाचे प्रतीक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमाला पंचायत समिती सदस्या सौ. सुवर्णा महेश संसारे, शाळेचे मुख्याध्यापक श्री. राहुल नांदुरकर, श्रीम. बारड मॅडम, श्री. कामत सर व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
देशी गायीचे महत्त्व, नैसर्गिक शेती, पंचगव्य उत्पादने आणि पर्यावरण संरक्षण यांची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरला. मार्गदर्शन केल्याबद्दल शाळेच्या वतीने श्री. महेश संसारे यांचे आभार मानण्यात आले.
