ती आज असती तर…
जागवल्या असत्या कितीतरी रात्री,
दाखवली असती स्वप्ने बहू,
हिरव्यागार गवताच्या गालीच्यावर,
माझ्या मांडीवर डोकं ठेऊन,
मोजले असते अवकाशातील तारे,
पाहिली असती त्यांची चमक,
अन मागून घेतलं असतं…
तुटणाऱ्या त्यातल्याच ताऱ्याकडे,
पुन्हा एकदा मलाच….
ती आज असती तर…
आठवून क्षण न क्षण तिच्या सवे,
मारल्या असत्या मोकळ्या गप्पा,
ओलांडला असता आयुष्यातील,
सुखद क्षणांचा एक एक टप्पा.
टिपले असते तिच्या ओठांवरचे हास्य,
नजरेच्या एका कटाक्षात…
अन घेताच बाहुत तिला,
ओशाळले असते आभाळ…
ती आज असती तर….
हरवलो असतो तिच्या नजरेत,
वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या…
तिच्या भाबड्या हृदयात.
अश्रू होऊन वाहून जाणारी,
कितीतरी दुःख तिने,
पिऊन टाकली असती एका क्षणात.
माझ्या गालावरून ओघळणारी…
ती आज असती तर…
आठवाव्या लागल्या नसत्या आठवणी,
सोडवावे लागले नसते कुठलेही प्रश्न,
निरुत्तर झाली नसती उत्तरे…
ना वाट पहावी लागली असती सोबतीची,
काळ्याकुट्ट अंधारातही आली असती,
सोबत न दिसणारी सावली बनून..
माझ्यावरच्या तिच्या प्रेमापोटीच..
ती आज असती तर…
(दिपी)✒️
दीपक पटेकर
८४४६७४३१९६