कट्टा गुरामवाडीतील आठ बंगल्यांतील घरफोडीचा छडा; दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात!
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई; आणखी दोन साथीदारांची नावे निष्पन्न, सोन्याचे दागिने व रोख रकमेच्या चोरीचा तपास सुरू
मालवण
मालवण तालुक्यातील कट्टा गुरामवाडी येथील निसर्गनगरी संकुलातील आठ बंद बंगल्यांमध्ये घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतले असून, आणखी दोन साथीदारांची नावे तपासात निष्पन्न झाली आहेत. सुशील यशवंत आळावे (वय २२, रा. देवली गवाणवाडी, मालवण) आणि संतोष मधुसूदन पांगे (वय ४८, रा. धुरीवाडा, मालवण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ ते २६ ऑक्टोबर रोजी पहाटे ३ वाजण्याच्या दरम्यान निसर्गनगरी संकुलातील आठ बंद बंगल्यांना चोरट्यांनी लक्ष्य केले होते. बंगल्यांचे दरवाजे आणि कडी-कोयंडे उचकटून आत प्रवेश करत चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी २६ ऑक्टोबर रोजी मालवण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०५ आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एकाच परिसरातील आठ बंगल्यांमध्ये झालेल्या घरफोडीचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने समांतर तपास सुरू केला. पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथके तयार करण्यात आली. घटनास्थळावरील माहिती, मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा माग काढला.
या तपासात सुशील आळावे आणि संतोष पांगे यांचा सहभाग निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी ५ नोव्हेंबर रोजी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान यश मुणगेकर (रा. भराड, मालवण) आणि येलन फर्नांडिस (रा. दांडी, सध्या रा. चौके) या आणखी दोघांसोबत मिळून घरफोडी केल्याची माहिती त्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ताब्यात घेतलेल्या दोघांची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासासाठी त्यांना मालवण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मोहन दहिकर आणि अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या आदेशानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, हनुमंत भोसले यांच्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
दरम्यान, आठ बंगल्यांमध्ये झालेल्या या घरफोडी प्रकरणाचा तपास महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला असून, चोरीस गेलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम हस्तगत करणे तसेच अन्य संशयितांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
