You are currently viewing गंगाराम सडवेलकर यांच्या संघर्षाला यश; पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठीचे उपोषण स्थगित!

गंगाराम सडवेलकर यांच्या संघर्षाला यश; पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठीचे उपोषण स्थगित!

गंगाराम सडवेलकर यांच्या संघर्षाला यश; पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठीचे उपोषण स्थगित!

प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांचे लेखी आश्वासन; वहिवाटीचे रस्ते खुले ठेवण्यासह बांधकामे स्थगित ठेवण्याचे निर्देश

कुडाळ

पिंगुळी पाझर तलावाच्या संरक्षणासाठी पिंगुळी जिल्हा परिषद सदस्य गंगाराम सडवेलकर यांनी सुरू केलेले उपोषण शुक्रवारी पाचव्या दिवशी दुपारी स्थगित करण्यात आले. कुडाळचे प्रभारी प्रांताधिकारी तथा तहसीलदार सचिन पाटील यांनी मागण्यांच्या अनुषंगाने लेखी आश्वासन दिल्यानंतर सडवेलकर यांनी हा निर्णय घेतला. संबंधित विकासक कंपनीला आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्याने उपोषण तूर्तास मागे घेण्यात आले.
पिंगुळी पाझर तलावाचे संरक्षण, शेतकऱ्यांचे पारंपरिक वहिवाटीचे रस्ते खुले ठेवणे आणि ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन या प्रमुख मागण्यांसाठी गंगाराम सडवेलकर यांनी २ नोव्हेंबरपासून कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. तलावाच्या अस्तित्वाला आणि ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी त्यांनी हा लढा उभारला होता.
प्रभारी प्रांताधिकारी सचिन पाटील यांनी दिलेल्या लेखी पत्रानुसार, स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या वहिवाटीचे रस्ते वापरण्यास अडथळा आणू नये, असे निर्देश संबंधित विकासक कंपनीला देण्यात आले आहेत. असा अडथळा निर्माण झाल्यास रस्ते तात्काळ खुले करून देण्याची सूचनाही करण्यात आली आहे.
पाझर तलावातील पाणी ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत असल्याने ते प्रदूषित होणार नाही, याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. तसेच लगतचे सार्वजनिक पाण्याचे स्रोत आटणार नाहीत किंवा त्यांना कोणतीही बाधा पोहोचणार नाही, याची कटाक्षाने काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय, संबंधित मिळकतीमध्ये सुरू असलेली बांधकामे या मुद्द्यांवर उचित कार्यवाही होईपर्यंत स्थगित ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.
दिवाळीचा सण आणि सध्या असलेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन उपोषण स्थगित करण्याचे आवाहनही प्रशासनाने लेखी पत्राद्वारे केले होते.
यावेळी बोलताना गंगाराम सडवेलकर यांनी, आपण गावाच्या विकासासाठी आणि पिंगुळी पाझर तलावाच्या रक्षणासाठी हा लढा उभारला असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांच्या सहमतीने उपोषण स्थगित करण्यात आले. हा पिंगुळी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी ‘पिंगुळी ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय असो’ अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनाला माजी आमदार वैभव नाईक, परशुराम उपरकर, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक व कृष्णा धुरी, नगरसेवक मंदार शिरसाट, संजय वेतुरेकर, ममता राऊळ, दीपक गावडे, बाबल गावडे, दर्शन कुडव यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा