You are currently viewing सावंतवाडीचा पर्यटन महोत्सव पुन्हा सुरू होणार; स्थानिक कलाकारांसाठी एक दिवस राखीव!

सावंतवाडीचा पर्यटन महोत्सव पुन्हा सुरू होणार; स्थानिक कलाकारांसाठी एक दिवस राखीव!

सावंतवाडीचा पर्यटन महोत्सव पुन्हा सुरू होणार; स्थानिक कलाकारांसाठी एक दिवस राखीव!

डिसेंबर अखेर किंवा जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन; उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांची घोषणा

सावंतवाडी :

स्थानिक कलाकार आणि नवोदित कलावंतांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेचा बंद पडलेला पर्यटन महोत्सव पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरू करण्यात येणार आहे. येत्या डिसेंबर अखेर किंवा नववर्षातील जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तीन दिवसीय पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून, त्यातील एक संपूर्ण दिवस स्थानिक कलाकारांसाठी राखीव ठेवण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी केली.
सम्राट क्लब सावंतवाडी टाऊनच्या वतीने मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून शहरातील वटसावित्री कला क्रीडा मंडळाच्या व्यासपीठावर आयोजित नाट्यकर्मींच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी ॲड. निरवडेकर यांनी सम्राट क्लबच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याचे कौतुक केले. सांस्कृतिक वसा जपत कला आणि कलाकारांना प्रोत्साहन देण्याचे काम सम्राट क्लबने यापुढेही अविरत सुरू ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नाट्यकर्मी व दिग्दर्शक शंभू पावसकर आणि जनार्दन पोकळे यांच्या नाट्य क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. वटसावित्री कला क्रीडा मंडळ गेली ८० वर्षे विविध सांस्कृतिक उपक्रमांसह नाट्य क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. मंडळाचे माजी उपनगराध्यक्ष उमाकांत वारंग यांनी नाट्य क्षेत्राला पुन्हा उभारी देण्यासाठी मोलाचे योगदान दिले. तसेच १९५३ पासून नाट्य क्षेत्रात दीर्घकाळ योगदान देणाऱ्या शंभू पावसकर आणि जनार्दन पोकळे यांच्या कार्याचाही यावेळी गौरव करण्यात आला.
उमाकांत वारंग आणि कल्पना बांदेकर यांचा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला नगरसेविका स्नेहा नाईक, सामाजिक कार्यकर्त्या संजना परब, सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेंद्र देशपांडे, सचिव प्रतिभा चव्हाण, भावी अध्यक्ष हरिश्चंद्र पवार, मालवणी कवी दादा मडकईकर, कौस्तुभ पेडणेकर, डॉ. सोनल लेले, स्मिता केंकरे आणि ॲड. सिद्धी परब आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेविका स्नेहा नाईक यांनीही सम्राट क्लबच्या सांस्कृतिक कार्याला शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उत्कृष्ट सूत्रसंचालन गुरुप्रसाद चिटणीस यांनी केले, तर कौस्तुभ पेडणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा