शहीद जवानांच्या पत्नींनी ३० नोव्हेंबरपर्यंत हयातीचा दाखला सादर करावा
सिंधुदुर्ग
जिल्ह्यातील सहा शहीद जवानांच्या पत्नींना सुवर्ण महोत्सवी योजनेंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत दरमहा अनुदान देण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांनी नियमानुसार आपला हयातीचा दाखला दर सहा महिन्यांनी सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांनी हयातीचा दाखला व आवश्यक कागदपत्रे सोमवार, दि. ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे सादर करावीत.
शासनाच्या निर्देशानुसार दरवर्षी ३१ मे आणि ३० नोव्हेंबर या दोन मुदतींना लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले प्राप्त झाल्यानंतरच मासिक अनुदान अदा करण्यात येते. त्यामुळे सुवर्ण महोत्सवी योजनेंतर्गत अनुदान घेणाऱ्या शहीद जवानांच्या पत्नींनी संबंधित बँक, सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडून स्वाक्षरी व शिक्क्यासह हयातीचा दाखला प्राप्त करून घ्यावा. या दाखल्यासोबत माजी सैनिक विधवा पत्नी ओळखपत्र आणि बँक पासबुकच्या छायांकित प्रती जोडून विहित मुदतीत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर कराव्यात.
निर्धारित मुदतीत हयातीचा दाखला कार्यालयास प्राप्त न झाल्यास दि. १ डिसेंबर २०२६ पासून संबंधित लाभार्थ्यांचे मासिक अनुदान दाखला प्राप्त होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येईल, याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी. याबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे दूरध्वनी क्रमांक ०२३६२-२२८८२० किंवा ९८३४४६५९०४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
