सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे २० नोव्हेंबर रोजी आयोजन सिंधुदुर्ग
युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार राष्ट्रीय युवा महोत्सवाचे रूपांतर ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग’ (Viksit Bharat Young Leaders Dialogue – VBYLD) या उपक्रमात करण्यात आले आहे. ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेशी युवकांच्या सर्जनशीलतेला व नेतृत्वगुणांना जोडण्याच्या उद्देशाने सन २०२६-२७ मधील सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन शुक्रवार, दि. २० नोव्हेंबर २०२६ रोजी करण्यात आले आहे.
जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सकाळी ९ वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, सिंधुदुर्गनगरी (नवीन), ता. कुडाळ येथे हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवातील विजेते स्पर्धक व संघांची कोल्हापूर विभागीय स्पर्धेसाठी निवड करण्यात येणार आहे.
यावर्षी सांस्कृतिक विभागातील स्पर्धा ‘नशामुक्त युवा – विकसित भारत’ (Nasha Mukt Yuva for Viksit Bharat) या संकल्पनेवर आधारित असणार आहेत. यामध्ये समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, चित्रकला, पथनाट्य आणि कविता लेखन अशा पाच स्पर्धांचा समावेश आहे. समूह लोकनृत्य व समूह लोकगीत स्पर्धांसाठी प्रत्येकी सात सहभागी आणि तीन साथसंगत कलाकारांचा संघ असणे आवश्यक आहे. तसेच पथनाट्य स्पर्धेसाठी एका संघात एकूण दहा सहभागी असतील.
या महोत्सवात जिल्ह्यातील १५ ते २९ वयोगटातील युवक-युवतींना सहभागी होता येणार आहे. माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक विद्यालये, वरिष्ठ महाविद्यालये, अभियांत्रिकी, विधी व वैद्यकीय महाविद्यालये, सांस्कृतिक संस्था, युवा मंडळे, राष्ट्रीय सेवा योजना तसेच स्काऊट व गाइडमधील विद्यार्थ्यांना सहभागाची संधी उपलब्ध आहे.
इच्छुक युवक-युवती व संघांनी महोत्सवात सहभागी होण्यासाठी https://forms.gle/WfrNM9DeHsSnYuSu6 या गुगल फॉर्मद्वारे मंगळवार, दि. १७ नोव्हेंबर २०२६ पूर्वी नावनोंदणी करावी.
जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, युवा मंडळे आणि सांस्कृतिक संस्थांनी आपल्या स्तरावरून जास्तीत जास्त युवक-युवती व संघांना या महोत्सवात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हास्तरीय युवा महोत्सव आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
