You are currently viewing अभ्युदयनगरच्या गणराजातर्फे पालघरमधील आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त मदतीचा हात

अभ्युदयनगरच्या गणराजातर्फे पालघरमधील आदिवासी पाड्यात दिवाळीनिमित्त मदतीचा हात

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर): बाल गोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ (अभ्युदयनगरचा गणराज) यांच्या वतीने दिवाळीनिमित्त पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी मु. पो. पोरेचापाडा, ग्रामपंचायत वाकडपाडा, ता. जव्हार, जि. पालघर येथील ७० कुटुंबांना पाच जीवनावश्यक वस्तू आणि मिठाईचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून सणाच्या आनंदात गरजू कुटुंबांनाही सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

वाटप करण्यात आलेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये तांदूळ, साखर, डाळ, पोहे आणि रवा यांचा समावेश होता. याशिवाय ३८ शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक डझन वह्या, एक चित्रकला वही, रंगपेटी, दोन पेन्सिली, दोन पेन, पट्टी, खोडरबर आणि शार्पनर असे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. तसेच २३ अंगणवाडी विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक पाटी, पाटी-पेन्सिल बॉक्स, चित्रकला वही, रंगपेटी, पट्टी, पेन्सिल, खोडरबर आणि शार्पनर देण्यात आले. पाड्यातील दोन वर्गखोल्यांसाठी दोन सिलिंग फॅन आणि सहा एल.ई.डी. ट्यूबलाईट बसविण्यात आले. सर्व मुलांना खाऊचेही वाटप करण्यात आले.

या उपक्रमाप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोस्कर, सरचिटणीस शैलेश सकपाळ, खजिनदार गोविंद नाईक, कार्याध्यक्ष प्रसाद खोडदे, विश्वस्त मंगेश नागांवकर, मनिष साळकर, सचिन फाळके, मंडळाचे उपपदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत वाकडपाडा येथील सरपंच, उपसरपंच, शिक्षक, ग्रामस्थ आणि दिंगत स्वराज्य फाऊंडेशनचे प्रतिनिधी केशव जाधव उपस्थित होते.

दिवाळीनिमित्त राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून मंडळाची सामाजिक बांधिलकी अधोरेखित झाली. आदिवासी पाड्यातील कुटुंबांना मदतीचा हात देतानाच विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठीही हातभार लावण्यात आला. सणाच्या आनंदासोबत सामाजिक जाणीव जपणारा हा उपक्रम ठरला.

प्रतिक्रिया व्यक्त करा