शिराळा तालुक्यातील मौजे गुढे येथे उभारले ‘अनघड दगडी बांध
सांगली / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :
पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल पातळीतवाढ करणे आणि ग्रामीण भागात जलस्वयंपूर्णता निर्माण करण्याच्या उद्देशाने, भूजल विभागाचे आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्या प्रेरणादायी संकल्पनेतून सांगली जिल्ह्यात एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या मोहिमेचा भाग म्हणून शिराळा तालुक्यातील मौजे गुढे येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालय, सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त लोकसहभागातून ‘अनघड दगडी बांध’ (Loose Boulder Check Dam) नुकतेच यशस्वीरीत्या बांधण्यात आले. या विधायक उपक्रमामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
अनघड दगडी बांध ही मृद व जलसंधारणातील अत्यंत प्रभावी आणि पर्यावरणपूरक पारंपरिक पद्धत आहे. यात कोणत्याही सिमेंट किंवा विटांचा वापर न करता स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेले कच्चे, न घडवलेले दगड (अनघड दगड) आणि मातीचा वापर करून ओढ्याच्या प्रवाहात टप्प्याटप्प्याने भिंत उभी केली जाते. प्रवाहाचा वेग मंदावेल अशा पद्धतीने पाण्याची गती रोखली जाते, ज्यामुळे जास्तीत जास्त पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते. हे बांध अतिशय कमी खर्चात, स्थानिक साधनसामग्रीद्वारे आणि श्रमदानातून सहज उभारता येतात. या बांधामुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी जागीच अडते आणि जमिनीत झिरपून परिसरातील विहिरी व बोअरवेलची भूजल पातळी उंचावण्यास मोठी मदत होते. पाण्याच्या वेगामुळे होणारी शेतजमिनीची धूप (मृद धूप) प्रभावीपणे रोखली जाते, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. उन्हाळ्याच्या दिवसांतही परिसरातील शेतीसाठी सिंचनाचे पाणी उपलब्ध होण्यास मदत होते, ज्यामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळतो.
या उपक्रमात वरिष्ठ भूवैज्ञानिक कार्यालयाच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक सुजाता सावळे, जिल्हा परिषद सांगलीचे उप अभियंता यांत्रिकी (देखभाल दुरुस्ती कक्ष) नदाफ, सहाय्यक भूवैज्ञानिक दिलावर मुल्ला, अमित जिरंगे, पियुष डहाके, कनिष्ठ भूवैज्ञानिक एम. एम. गडकरी, गणेश गोडसे, तांत्रिक अधिकारी वैशाली मिसाळ, सर्वेक्षक एस. आर. पवार, भौ.मा.प्र. वरिष्ठ सहाय्यक आशिष गळतगे, भौ.मा.प्र. सहाय्यक श्रीशैल बबलेश्वर, कनिष्ठ लिपिक अतुल जाधव, सहाय्यक आवेधक सोनु तुरे तसेच कार्यालयातील जिल्हा संनियंत्रण कक्षातील रसायनी प्रमोद भोसले, डाटा एंट्री ऑपरेटर अरुणा पाटील व वल्लभ याबरोबरच मौ.गुढे ग्रा.पं मधील लिपिक अधिक पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या संपूर्ण अभियानात मौ.गुढे गावातील ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने श्रमदान करत सक्रिय सहभाग नोंदवला. प्रशासकीय अधिकारी आणि ग्रामस्थांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अवघ्या काही वेळातच हे अनघड दगडी बांध पूर्णत्वास आले. शासकीय अधिकारी आणि ग्रामस्थ यांच्यातील या उत्तम समन्वयामुळे हा उपक्रम पार पडला असून, ग्रामस्थांनी या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
