You are currently viewing मला आवडलेले व समजलेले श्री संत तुकाराम महाराज

मला आवडलेले व समजलेले श्री संत तुकाराम महाराज

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री शालोमित खान लिखित अप्रतिम लेख*

 

*मला आवडलेले व समजलेले श्री संत तुकाराम महाराज* 

 

मराठी भाषा आणि तिच्या साहित्य आणि काव्यावर प्रेम करणाऱ्या माझ्या सर्व मित्र-मैत्रिणींनो. आज मी परत आपल्यासमोर तुकारामांचे दोन अभंग आणि अभंगांचा अर्थ आणि भाव विशद करणार आहे. कुठलीही प्रस्तावना न करता मी सरळ आपल्या विषयाकडे वळते. आज पहिला जो अभंग मी निवडला आहे तो आपल्याला थोडासा वेगळा वाटेल अनोखा वाटेल कारण त्याचा विषय विठ्ठल किंवा पांडुरंग नाही. कोणता आहे तो अभंग आपण पाहूया

कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता/बहिण बंधू चुलता / कृष्ण माझा/

कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू/उतरू पैलतीरू भव नदीचा/

कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन/सोयरा सज्जन कृष्ण माझा/

तुका म्हणे माझा कृष्णविसावा/वाटे न करावा परत जीवा/

आता या अभंगाचा अर्थ आपण पाहूया. खरंतर हा अभंग समजण्यास अत्यंत सोपा आहे जेव्हा आपण त्याला वाचतो तेव्हाच त्याचा अर्थ लक्षात येतो पण मला येथे एकच गोष्ट सांगायची आहे आणि ती म्हणजे आत्तापर्यंत आपण पाहिले की तुकाराम महाराज आपल्या प्रत्येक अभंगात एकच गोष्ट अगदी ठामपणे सांगतात आणि ती म्हणजे ते विठ्ठलाचे भक्त आहेत ते इतर कोणत्याही देवाला मानत नाहीत ते विठ्ठला पाशी एकनिष्ठ आहेत त्यांनी असे सुद्धा सांगितले आहे की जर मी कोणाला दुसऱ्या देवाचे नाव घेईन तर माझ्या जिभेची शंभर शकले होऊन खाली पडतील असे असताना तुकाराम महाराजांनी या अभंगात कृष्णाची प्रशंसा कृष्णाची भक्ती का बरं केली आहे? तर त्याचे उत्तर अगदी सोपे आहे शोधून पाहिले तर त्यातील अर्थ लक्षात येतो. आपणा सर्वांना माहित आहे की वारकरी संप्रदाय हा एकदम वेगळा आणि अचानक निर्माण झालेला संप्रदाय नाही त्याला एक पार्श्वभूमी आहे एक संदर्भ आहे आणि तो म्हणजे हा वारकरी संप्रदाय यापूर्वीच संप्रदाय अत्यंत लोकप्रिय होता आणि तो म्हणजे भागवत संप्रदाय या संप्रदायातून वारकरी संप्रदायाचा जन्म झालेला आहे. आणि आपण पाहिले असेल की भागवत संप्रदाय हा पूर्णतः कृष्ण भक्तीवर अवलंबित होता. त्यांच्यासमोर एकच देव होता आणि तो म्हणजे कृष्ण या कृष्णाला समोर ठेवूनच भागवत संप्रदायाच्या सर्व भक्तांनी आपले भक्ती काव्य प्रस्तुत केले आहे. म्हणूनच या संप्रदायातून उगम पावलेल्या वारकरी संप्रदायातील सर्व भक्तांनी विठ्ठलाला कृष्णाचे एकरूप मानलेले आहे त्यांच्या दृष्टीत कृष्ण आणि विठ्ठल एकच आहेत म्हणूनच जेव्हा विठ्ठलाचा गजर होतो तेव्हा

विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल असा विठ्ठल नामाचा गजर केला जातो या गजरांमध्ये हरी हा शब्द कृष्णासाठी वापरला गेला आहे अशा प्रकारे वारकरी संप्रदायातील भक्तांनी विठ्ठलाला कृष्णाचे स्वरूप मानले आहे आणि अनेक भक्तांच्या भक्ती काव्यामध्ये आपल्याला कृष्णाचे नाव घेतलेले दिसून.. येते त्या सर्वांचा उल्लेख मी येथे करत नाही कारण मग खूप अधिक विषय विस्तार होईल म्हणून परत मी आता आपल्या अभंगाकडे येते आणि खरंतर त्याचा अर्थ सांगण्याची आवश्यकता नाही इतका तो सोपा आहे सुलभ आहे तरी मी त्याचा अर्थ सांगून माझ्या दुसऱ्या अभंगाकडे वळेल.

अर्थ: तुकाराम महाराज म्हणतात कृष्णच माझी आई आहे कृष्णच माझा पिता ही आहे. कृष्ण च माझी बहीण माझा भाऊ माझा चुलता आहे. म्हणजे माझे जे कोणी नातेवाईक आहेत ते सर्व कृष्णच आहे. ते पुढे म्हणतात कृष्ण माझा गुरु आहे कृष्ण माझा तारू आहे अर्थात माझी नौका आहे ही नावच मला हा भवसागर अर्थात विश्वरूपी सागर पार करण्यास

 

मदत करेल. कृष्णच मला या भवसागरातून पार घेऊन जाईल. माझे जे काही आहे ते कृष्णाचं आहे माझे मन कृष्ण आहे माझे जन कृष्ण आहे माझे जे काही सगळे सोयरे आहेत नातेवाईक आहेत जे कोणी सज्जन माझ्या जवळ आहेत ते सर्व कृष्णच आहेत.

तुकाराम महाराज म्हणतात की माझा विसावा कृष्णच आहे त्याच्या पायी मला विश्रांती मिळेल मुक्ती मिळेल माझ्या मनाला असे वाटते की आता कृष्णा पासून माझ्या जीवाला वेगळे करू नये कृष्णा पासून दूर जाऊ नये माझे शेवटचे स्थान हे कृष्णाचे आहे.

अशाप्रकारे तुकाराम महाराजांनी कृष्णाच्या प्रती म्हणजेच विठ्ठलाच्या प्रति आपली भक्ती भावना प्रस्तुत केली आहे.

आता आपण श्री संत तुकाराम महाराज यांचा दुसरा अभंग पाहूयात.

देव सखा जरी/जग अवघे कृपा करी/

ऐसा असूनही अनुभव/कासावीस होती जीव/

देवाची जतन/तया बांधूं न शके अग्न/

तुका म्हणे हरी/प्रल्हादासी यत्न करी/

या अभंगांमध्ये तुकाराम महाराजांनी पुन्हा एकदा हेच सांगितले आहे की तुम्हाला प्रत्येक संकटातून , कोणत्याही बाधेपासून वाचवणारा विठ्ठलच आहे. विठ्ठल खरा मित्र आहे जो संकट समयी तुमच्या कामाला येतो मदतीला येतो. म्हणूनच ज्याचा देव मित्र आहे विठ्ठलाचा मित्र आहे त्याच्यावर सर्व जग कृपा करते त्याच्याशी चांगले वागते कोणी त्याचे वाईट करू शकत नाही. मला आश्चर्य वाटते की असे असून देखील लोक उगीचच कासावीस व्याकुळ का होतात. ते या गोष्टीवर विश्वास का नाही ठेवत की विठ्ठल ज्याचा सखा त्याचे कोणी काहीही बिघडवू शकत नाही. त्याने देवाची भक्ती केली त्याचे वाईट अग्नी सुद्धा करू शकत नाही अग्नि सुद्धा त्याला जाळू शकत नाही. अहो भक्त जन हो तुमच्या डोळ्यासमोर उदाहरण आहे ते म्हणजे भक्त प्रल्हादाचे त्याच्या वडिलांनी अर्थात राजा हिरण्यकशप्पू याने आपल्या मुलाला म्हणजेच भक्त प्रल्हाद याला मारण्याचे किती प्रयत्न केले कारण एकच होते की तो विठ्ठलाची भक्ती करत होता जे त्याच्या वडिलांना आवडत नव्हते म्हणूनच त्यांनी त्याला मारण्याचे अनेक उपाय केले पण काही उपयोग झाला नाही शेवटी राजाने प्रल्हादाला चितेवर जाण्याचा प्रयत्न केला परंतु तेथे देखील विठ्ठलाने त्याला वाचविले आणि त्या चितेतील अग्नी शितल होऊन गेला. ती कथा तर सर्वांना माहीतच आहे की राजाने आपली बहीण होलिका जिला अग्नी जाळू शकत नव्हता तिला चितेवर बसविले होते आणि तिच्या मांडीवर प्रल्हादाला बसविले होते परंतु आगे मध्ये होलिका जळून मेली आणि प्रल्हाद जशाचे तसा जिवंत बाहेर आला. या प्रसंगाची आठवण म्हणूनच होळीच्या दिवशी होळी जाळून होलीकाची पूजा केली जाते.

सांगण्याचे तात्पर्य एवढेच की ज्याने विठ्ठलाला जवळ केले त्याच्याजवळ कुठलेही संकट कुठलेही दुःख कोणताही त्रास जाऊ शकत नाही.

मित्रांनो मी आता येथे थांबते. आजच्या अभंग आणि त्यातील अर्थ निरूपण आपल्याला कसे वाटले अभिप्राय जरूर देऊन जरूर कळवावे मी प्रतीक्षा करेल.

 

आपली सर्वांची मैत्रीण

शालोमित खान

प्रतिक्रिया व्यक्त करा