You are currently viewing शब्दगंध सामूहिक वाचन उपक्रमासाठी पुस्तके भेट द्या : राजेंद्र उदागे यांचे आवाहन

शब्दगंध सामूहिक वाचन उपक्रमासाठी पुस्तके भेट द्या : राजेंद्र उदागे यांचे आवाहन

नेवासा तालुका शाखेचा वाचन संस्कृती रुजविण्यासाठी स्तुत्य उपक्रम

अहिल्यानगर / प्रदीप जोशी, ज्येष्ठ पत्रकार :

वाचन संस्कृतीचा प्रसार करून ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि नव्या पिढीला पुस्तकांशी जोडण्याच्या उद्देशाने शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य, नेवासा तालुका शाखेच्या वतीने गावोगावी ‘ फिरते मोफत वाचनालय ‘ व ‘शब्दगंध सामूहिक वाचन उपक्रम’ राबविण्यात येत आहे. या उपक्रमाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी नागरिकांनी आपल्या संग्रही असलेली पुस्तके व ग्रंथ भेट द्यावेत, असे आवाहन परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व संस्थापक सचिव सुनील गोसावी यांनी केले आहे.

वाचनामुळे व्यक्तीच्या ज्ञानात भर पडते, आचरणात सुधार व विचारांना दिशा मिळते आणि समाज अधिक प्रगल्भ होतो. हाच विचार केंद्रस्थानी ठेवून नेवासा तालुका शाखेच्या वतीने ग्रामीण भागात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी व वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांतर्गत कथा, कादंबऱ्या, कवितासंग्रह, चरित्रे, आत्मचरित्रे, वैचारिक साहित्य, बालसाहित्य , धार्मिक आणि संदर्भग्रंथ अशा विविध प्रकारच्या पुस्तकांची आवश्यकता आहे.विशेष म्हणजे, नेवासा तालुका शाखेच्या वतीने प्रा. डॉ. किशोर धनवटे, माजी प्राचार्य डॉ. अशोकराव ढगे, प्रा. डॉ. दिगंबर सोनवणे, लोककलावंत दिगंबर गोंधळी , पांडूरंग रोडगे आणि शब्दगंधची नेवासा तालुका टीम स्वखर्चाने गावोगावी हा उपक्रम राबवीत आहे. एक सामाजिक जबाबदारी म्हणून त्यांच्या या प्रयत्नांना पुस्तक प्रेमी, साहित्यिक, शिक्षक, नागरिक आणि दानशूर व्यक्तींनी पुस्तक भेट देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

घरातील कपाटात वाचकांच्या प्रतीक्षेत असलेले पुस्तके एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा देऊ शकते. त्यामुळे पुन्हा वाचण्याची शक्यता नसलेली किंवा इतरांना वाचनासाठी उपलब्ध करून देता येतील अशी पुस्तके या उपक्रमासाठी द्यावीत. प्रत्येक पुस्तक नव्या वाचकापर्यंत ज्ञान पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम ठरू शकते.

पुस्तक भेटीसाठी संपर्क

1. श्री. राजेंद्र उदागे

अध्यक्ष, शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य

पत्ता : जाधव लॉन्स, नगर–कल्याण रोड, अहिल्यानगर

मोबाईल : ९८५०७१६६६६

2. श्रीमती शर्मिला गोसावी

राज्य कार्यकारिणी सदस्य, शब्दगंध साहित्यिक परिषद

पत्ता : वॉरियर्स प्री प्रायमरी स्कूल, कॉटेज कॉर्नरच्या पाठीमागे, सावेडी, अहिल्यानगर

मोबाईल : ९३२५१०७५८८

याशिवाय शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या विविध तालुका शाखांच्या प्रमुखांकडेही पुस्तके सुपूर्त करता येतील.

या उपक्रमाला अधिकाधिक नागरिकांनी प्रतिसाद देऊन वाचन चळवळ बळकट करावी, असे आवाहन संस्थापक सचिव सुनील गोसावी, उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.पी. ढाकणे, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, शाहीर भारत गाडेकर, खजिनदार भगवान राऊत, प्रा. डॉ.अशोक कानडे, प्रा. डॉ. अनिल गर्जे, राजेंद्र चोभे, प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर, राजेंद्र पवार, बबनराव गिरी, सुभाष सोनवणे, प्रशांत सूर्यवंशी, जयश्री झरेकर, स्वाती ठुबे, नेवासा तालुका शाखाध्यक्ष प्रा. डॉ.किशोर धनवटे, प्राचार्य अशोकराव ढगे, प्रा.डॉ. दिगंबर सोनवणे, दिगंबर गोंधळी व शर्मिला गोसावी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा