हुमरमळा-वालावल येथे १ नोव्हेंबरला मोफत आयुर्वेदिक आरोग्य शिबिर
जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादासाहेब साईल यांच्या हस्ते उद्घाटन; रुग्णांना मोफत तपासणी व औषधोपचार
पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांचे पंचक्रोशीतील नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन
कुडाळ
हुमरमळा (वालावल) येथे अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, धारगळ (गोवा) आणि ग्रामपंचायत हुमरमळा यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ नोव्हेंबर रोजी मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन सकाळी ९.३० वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि उपाध्यक्ष दादासाहेब साईल यांच्या हस्ते होणार आहे.
परिसरातील अनेक रुग्णांना उपचारांसाठी धारगळ येथील आयुष रुग्णालयात जावे लागते. हा प्रवासाचा त्रास कमी व्हावा आणि स्थानिक पातळीवरच नागरिकांना आयुर्वेदिक उपचारांचा लाभ मिळावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरात विविध आजारांची तपासणी करून रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात येणार आहे. हुमरमळा-वालावलसह पंचक्रोशीतील नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता यावा, यासाठी आयोजकांनी पुढाकार घेतला आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी या मोफत आयुर्वेदिक आरोग्य तपासणी व चिकित्सा शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन पंचायत समिती सदस्या अर्चना बंगे यांनी केले आहे.
